Sat, May 25, 2019 23:16होमपेज › Sangli › भाजपचे ‘साम, दाम’ थांबविण्यासाठी आघाडी

भाजपचे ‘साम, दाम’ थांबविण्यासाठी आघाडी

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:29PMसांगली : प्रतिनिधी

भाजपचे साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण  थांबविण्यासाठी काँग्रेस  आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. भाजपची राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेली विजयाची मालिका सांगलीत  थांबवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार  जयंत पाटील व काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे केले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाल्याची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी केली. यावेळी माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री  प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील,  काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आदी उपस्थित होते. 

पाटील आणि कदम म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा भाजपला होऊ नये यासाठी राज्यस्तरावर  समविचारी  पक्षांनी  एकत्र येण्याची  प्रक्रिया सरू झाली आहे. तसेच सांगलीत भाजप मूळ धरू नये यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. भाजपने राज्यात अनेक ठिकाणी साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब करून निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र त्याला नांदेड पॅटर्नने शह दिला आहे. सांगलीतही असाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे. भाजपच्या विजयी मालिकेला सांगलीत थांबविले जाईल.  ते पुढे म्हणाले, उमेदवारी देताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच ठिकाणी आम्ही योग्य उमेदवार उभे केले आहेत. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट  देऊ  शकलो नाही. त्यांची नाराजी दूर केली आहे. काही प्रमाणात नाराजी आहे, पण त्यांचा योग्य वेळी सन्मान केला जाईल. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचा धोका नाही. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षात गैरमेळ राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.  महापालिका क्षेत्रातील विकास व आव्हानांची  जाणीव दोन्ही पक्षांना आहे. विकासाच्या सुत्रावर आम्ही एकत्रित आल्याने जाहीरनामा लवकरच  जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांतील 10 ते 12 तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती जाहीरनामा तयार करणार आहे. 

संविधान बदलण्याचा भाजपचा घाट 

जयंत पाटील, विश्‍वजीत कदम म्हणाले, देशात व राज्यातील सरकारकडून दलित, अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार सुरू आहेत. भाजपने संविधान बदलण्याचा घाट घातला आहे.