Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Sangli › बंडखोरी, निष्ठावंताना संधीसाठी नेत्यांची कसोटी

बंडखोरी, निष्ठावंताना संधीसाठी नेत्यांची कसोटी

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 9:02PMमिरज : जे. ए. पाटील

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेतून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांची संख्या वाढली आहे. यामुळे  निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना बंडखोरी टाळण्यासाठीही नेत्यांची कसोटी  लागणार आहे.

निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमपासून स्वतंत्र मोर्चे बांधणी करत अन्य  पक्षातील आजी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांना ेआपल्याकडे खेचून घेण्यात ‘आघाडी’ मिळवली आहे. अर्थात यात आयात केलेल्या कार्यकर्त्यांना संधी देत असताना स्वपक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्यता असल्याने बंडखोरी अटळ आहे. संभाव्य बंडखोरी कशी रोखायची, असा नेत्यांपुढे प्रश्‍न उभा ठाकला असल्याचे चित्र आहे.

यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत भाजप मिरजेतील काही प्रभागापुरता मर्यादित होता. या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कशीबशी 1 ते 4  दरम्यान असायची.  परंतु गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात भाजपने घवघवीत यश मिळवले, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणातून भाजपने आता ग्रामपंचायतींपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळे यावेळची महापालिका निवडणूक जिंकायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे.

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणिस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. आयात केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. सत्ता मिळविण्याच्या स्पर्धेत या पक्षाने आघाडीत घेत असताना स्वपक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पक्ष नेतृत्वाच्या या बदललेल्या भूमिकेमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सर्वच प्रभागात भाजपच्या उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे.    

दरम्यान, यावेळी शिवसेनेनेही भाजप विरोधात जोरदार तयारी चालविली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार की एकमेकांविरुद्ध लढणार, याबाबत साशंकता असून शिवसेनेने अद्याप भाजप विरोधात ताठर भूमिका घेतली आहे.

महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  यावेळी त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. त्याचबरोबर काँग्रेसबरोबरही आघाडी करण्याची त्यांची तयारी होती. सत्ताधारी काँग्रेसनेही स्वबळाची तयारी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करणे अपरिहार्य बनले आहे. आघाडी झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही कार्यकर्त्यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. यामुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडू नये यासाठी देखील  वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न होताना दिसून येत आहेत.