Fri, Nov 16, 2018 10:49



होमपेज › Sangli › संशयिताच्या शोधासाठी छापे

संशयिताच्या शोधासाठी छापे

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:34PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

शहरातील भूमी प्रॉपकॉर्न कंपनीत ठेवलेली दहा लाखांची ठेव परत न दिल्याप्रकरणी मुख्य संशयित मनोज कदम याच्या शोधासाठी पोलिसांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकले. दरम्यान, त्याचा भाऊ विनोदला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मनोज कदम गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी आहे. याबाबत इनाम धामणीतील सुशीला पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोजकडे सुशीला पाटील यांनी त्यांच्या व सुनेच्या नावावर ठेव ठेवण्यासाठी दहा लाख रूपये 2014  मध्ये दिले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी ठेव परत देण्याविषयी तगादा लावला होता. मात्र आजतागायत त्याने ठेवीची रक्कम परत दिली नाही.  गुन्हा दाखल झाल्यानंतर  विश्रामबाग पोलिसांनी कदम याच्या घरावर छापा टाकला होता. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर पाटील यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्याकडे तक्रार केली. शुक्रवारी रात्री मुख्य संशयित मनोजचा भाऊ व कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर विनोदला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  

दरम्यान, मनोज कदम अद्यापही सापडला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी रविवारी पोलिसांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले.  त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.