Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Sangli › तासगाव तालुक्यात तलाव कोरडे 

तासगाव तालुक्यात तलाव कोरडे 

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 7:46PMतासगाव : दिलीप जाधव   

तासगाव तालुक्यावरील जनता भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. तलावातील पाण्याचा फक्त मृतसाठा शिल्लक आहे. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाणी व चार्‍याअभावी जनावरांचे अतोनात हाल होत आहे. पशुधन जगवायचे तरी कसे? या काळजीने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. 

अंजनी, बलगवडे तलाव कोरडे पडले आहेत. मोराळे, लोढे आणि सिध्देवाडी तलावांची पाणीपातळी सीलखाली गेली आहे. पुणदी तलावात 13 टक्के तर पेड तलावात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कडक उन्हामुळे या तलावातील शिल्लक असलेला पाणीसाठा सुद्धा झपाट्याने कमी होत आहे.

तालुक्यातील सात तलावांची मिळून पाणी साठवण क्षमता 708.91 दशलक्ष घनफूट आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 563.45 दशलक्ष घनफूट आहे. मृतसंचय 145.46 दशलक्ष घनफूट आहे. आजमितीस सात तलावांत फक्त 52.67  दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. हा साठा एकूण साठवण क्षमतेच्या 7 टक्के आहे.