Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Sangli › जाणवतेय ‘त्रिमूर्तींची’ उणीव!

जाणवतेय ‘त्रिमूर्तींची’ उणीव!

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 8:45PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या रणमैदानात यंदा प्रथमच (स्व.) मदनभाऊ पाटील, (स्व.) डॉ. पतंगराव कदम आणि पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवताना दिसत आहे. केवळ त्यांच्या अनुपस्थितीमुळेच आज महापालिकेच्या राजकारणात नवनवीन राजकीय समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत.

सांगली नगरपालिकेत पूर्वापार  वसंतदादा घराण्याची सत्ता होती. या सत्तेची सुत्रे मदन पाटील यांच्या हातात आल्यानंतर शेवटपर्यंत त्यांनी पालिकेच्या आणि त्यानंतर महापालिकेच्या राजकारणावर मांड ठोकली. मध्यंतरी यशस्वी झालेला महाआघाडीचा प्रयोग वगळता महापालिकेतील मदन पाटील यांच्या सत्तेला धक्का लागू शकला नव्हता. महापालिका आणि मदन पाटील या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. 

आज काँग्रेसअंतर्गत मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आलेली दिसते. मदन पाटील यांच्या हयातीत गटबाजी नव्हती अशातला भाग नाही, पण हे सगळे गटतट शेवटी मदन पाटील यांच्यापाशी येऊन एक होत होते. आताप्रमाणे त्यावेळीही उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन होत असे, पण सगळ्यांनाच जाणीव असायची की अंतिम निर्णय हे भाऊच घेणार. त्यामुळे कुणाची फारशी खळखळ चालायची नाही. उमेदवारी मिळाली नाही तर त्यावेळीही बंडखोरी दिसायची, पण त्याचे प्रमाण हे एका हाताच्या बोटावर मोजता येण्यापुरते असायचे. मदन पाटील यांच्या कारकिर्दीत महापालिकेचा कारभार हा जणू काही एकखांबी तंबू होता. आज मात्र काँग्रेसकडे मदनभाऊंच्या पश्‍चात सामुदायिक नेतृत्वाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसते.

स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी महापालिकेच्या राजकारणात कधीही स्वत:चा गट निर्माण करण्याचा किंवा गटबाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र महापालिकेतील कारभार्‍यांवर आणि पर्यायाने मदन पाटील यांच्या गटावर डॉ. कदम यांच्या रूपाने एक आदरयुक्त दरारा असायचा. अनेकवेळा महापालिकेतील अंतर्गत तंटेबखेडे अंतिम निर्णयासाठी पतंगरावांच्या दरबारात जायचे. अशावेळी त्यांना मदनभाऊंवर कुरघोडी करता आली असती, पण महापालिकेच्या राजकारणात त्यांनी कधीही मदन पाटील यांना डावलून किंवा त्यांना अंधारात ठेवून काम केले नाही. निवडणुकीच्या वेळीही उमेदवार निवडीत त्यांचा सहभाग केवळ एक ज्येष्ठ नेता म्हणून  मर्यादित असायचा. अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांनी जसेकाही मदन पाटील यांना बहालच करून टाकले होते. असे असले तरी महापालिकेच्या राजकारणावर आणि एकूणच कारभारावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. जरा कुठे वेडेवाकडे होतेय असे दिसले की संबंधितांची जाहीर ठिकाणी खरडपट्टी काढायलाही ते कमी करत नव्हते, त्यामुळे काँग्रेसला आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली नसती तरच नवल! 

माजी आमदार संभाजी पवार यांनाही कधी तत्कालीन सांगली नगरपालिकेची आणि त्यानंतर महापालिकेची सत्ता काबीज करता आली नाही, पण नगरपालिकेतील आणि महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या कारभारावर अंकूश ठेवण्याचे काम विरोधक म्हणून त्यांचा गट सातत्याने पार पाडत आला आहे. सत्ताधार्‍यांचे अनेक निर्णय केवळ पवार गटाच्या विरोधामुळे रोखले गेल्याची शेकडो उदाहरणे बघायला मिळतात. नगरपालिका ते महापालिका आणि नागरिक संघटना, जनता दल, भाजप ते शिवसेना या संभाजी पवारांच्या राजकारणात महापालिकेतील त्यांचा गट मात्र सातत्याने सक्रिय असल्याचे जाणवते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पवारांचे उपेक्षित घटकांवर  केंद्रीत राजकारण. आज महापालिकेची निवडणूक लढविणे पैशाअभावी सर्वसामान्यांना शक्य राहिलेले नाही. मात्र पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजातील हमाल, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीविक्रेते आदी उपेक्षित घटकांच्या मदतीने याच घटकातील अनेकांना सत्तेची कवाडे खुली करून देण्याचे काम केले. मात्र सध्या पवार हे महापालिका निवडणुका आणि पक्षीय राजकारणापासून अलिप्त दिसतात.त्यामुळे सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत स्व. मदनभाऊ, डॉ. पतंगराव आणि संभाजी पवार यांची अनुपस्थिती त्यांच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही प्रकर्षाने जाणविल्याशिवाय रहात नाही.

सामुदायिक नेतृत्व आणि बाह्य हस्तक्षेप!

पूर्वी महापालिका आणि मदनभाऊ हे एकच समीकरण होते. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाचे अन्य नेतेसुध्दा महापालिकेच्या राजकारणात फारसे लक्ष घालताना दिसत नव्हते. त्यांच्या पश्‍चात मात्र जयश्रीताई पाटील, आ. विश्‍वजित कदम, प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यापुढे सामुदायिक नेतृत्वाशिवाय पर्याय राहिलेला नाही. दुसरीकडे मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या पश्‍चात काँग्रेसच्या जिल्ह्याबाहेरील आ. सतज पाटील आणि हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांना यंदा प्रथमच महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालावे लागत आहे.