Wed, Mar 20, 2019 23:20होमपेज › Sangli › गुंठेवारी, मळे भागात मूलभूत सुविधांचा अभाव

गुंठेवारी, मळे भागात मूलभूत सुविधांचा अभाव

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 7:52PMमिरज : जे. ए. पाटील

गुंठेवारी आणि मळेभागाची समस्या असलेल्या प्रभाग क्र. 20 मध्ये प्रामुख्याने ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. तसेच या प्रभागालगत मिरज-कृष्णाघाट रस्त्यावरील वीट भट्ट्यांमुळे परिसरातील नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात आहेत.मिरज-कृष्णाघाट रस्त्याचा पश्‍चिम भाग आणि कृष्णाघाट या प्रभागामध्ये येतो. महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचे जॅकवेल या प्रभागात आहे. संपूर्ण शहराला शुद्ध पिण्याचा पुरवठा करणार्‍या कृष्णाघाटाला मात्र पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नव्हते. परंतु आता कृष्णाघाटावरील नागरी वस्तीस शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तथापि विस्तारित मळेभागातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना कुपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. तसेच महापालिकेने ठिकठिकाणी ठेवलेल्या  सिंटेक्स टाकीतील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. पिण्याच्या पाण्याबरोबरच या प्रभागात ड्रेनेज व्यवस्थाही अपुरी आहे. काही प्रमाणात शहरालगत ड्रेनेजची कामे झाली असली तरी विस्तारित भागात ही व्यवस्थाच अद्याप पोहोचलेली नाही. कोल्हापूरचाळ, उत्तमनगर, पंढरपूरचाळ, गोसावी मळा या भागातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.

ड्रेनेज व्यवस्था जुनी आणि अपुरी असल्याने ठिकठिकाणी पावसाळ्यात ड्रेनेज तुंबते. त्यामुळे ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावरुन वहात असते. सांडपाण्यामुळे दरवर्षी नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जागे लागते. ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जुनी आणि कालबाह्य झाली आहे. त्यामुळे बर्‍याचवेळा दूषित पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. बर्‍याचवेळा प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि अडविण्यासाठी राजकीय संघर्ष पहायला मिळतो.कृष्णाघाट रस्त्यावरील वीट भट्ट्यांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचा नागरिकांना त्रास होतो. रस्त्याच्या पूर्व बाजूकडील असलेल्या वीट भट्ट्यांचा त्रास सर्वांनाच होताना दिसून येतो. या प्रभागात पुरेशा प्रमाणात ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला गेला नाही. 

समस्या प्रभागाच्या 20

लोकसंख्या : 19 हजार 642

परिसर : शास्त्री चौक, नदीवेस, कृष्णाघाट, रेल्वेलाईन झोपडपट्टी, कोल्हापूर चाळ, ख्वॉजा बस्ती, गोसावी गल्ली, मळेभाग, जुना हरिपूर रोड.