Tue, Apr 23, 2019 09:58होमपेज › Sangli › अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन

अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्या शेतकर्‍यांसाठी सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटना, सांगली शहर सुधार समिती, आम आदमी पार्टी, वकील संघटना, महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार युनियन आदि संघटना सहभागी झाल्या होत्या. शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या सरकारचा  निषेध करण्यात आला. दि. 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिल्लेगाव येथील साहेबराव करपे या शेतकर्‍याने  पत्नी, दोन मुली, दोन मुले यासह  आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी करपे यांनी   नापिकी, कर्जबाजारीपणा, बँकांचे सावकारी शोषण या कारणांमुळे  आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले.

ती पहिली ज्ञात शेतकरी आत्महत्या ठरली. करपे यांच्या आत्महत्येपासून सुरू झालेले लोण धर्मा पाटील यांनी मंत्रालयात जाऊन केलेल्या आत्महत्येपर्यंत पोहोचले आहे. करपे यांच्या आत्महत्येस आज 32 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्य शेतकरी सुकाणू समितीने राज्यभर अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एकदिवसीय उपोषण- धरणे आंदोलन  प्रत्येक जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे आज येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, ‘आप’चे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत, अ‍ॅड. प्रकाश जाधव, सांगली जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, शंकर पुजारी, आसिफ बावा, अशोक माने, नंदकुमार पाटील, गोपाळ पाटील, संजय माळी आदी सहभागी झाले होते.