Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Sangli › जिल्हा परिषद स्वीय निधीत एलईडी घोटाळा

जिल्हा परिषद स्वीय निधीत एलईडी घोटाळा

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 8:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद स्वीय निधीतून दि. 4 सप्टेंबर 2015 ते 30 मार्च 2016 या कालावधीत सदस्य विकास निधीत (सामुहिक विकास कार्यक्रम) एलईडी घोटाळा झाल्याची माहिती चव्हाट्यावर येत आहे. सुधारित दरसुची असताना जुन्या दरसुचीने एलईडी खरेदी करून सुमारे वीस लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य विकास निधीतून नेमका कोणाचा विकास झाला. थेट ‘धनलाभ’ कोणाला झाला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील यांनी केली. 

आमदार फंड, खासदार फंडाच्या धर्तीवर जिल्हा परिषद सदस्यांनाही विकास निधी मिळाला पाहिजे, अशी सदस्यांची शासनाकडे मागणी होती. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सन 2013-14 पासून जिल्हा परिषद स्विय निधीतून सदस्य फंड सुरू करण्याचा निर्णय झाला. सामुहिक विकास कार्यक्रम या नावाने योजना सुरू केली. मात्र त्याचे नाव जिल्हा परिषद सदस्य फंड असेच रूढ झाले. रस्ते, गटारी, पाणी, शाळांना सुविधा, शैक्षणिक सॉफ्टवेअर, सार्वजनिक विद्युत सुविधा व एकूणच लोकांच्या सार्वजनिक सेवा-सुविधांसाठी हा सदस्य फंड (सामुहिक विकास कार्यक्रम) वापरला जावू लागला. . 

स्विय निधीतील सदस्य फंडातून दि. 4 सप्टेंबर 2015 ते दि. 30 मार्च 2016 या कालावधीत एलईडी बल्ब खरेदीची 28 कामे झाली. एलईडीचे 602 नग खरेदी करून संबंधित ग्रामपंचायतींना दिले. दि. 29 डिसेंबर 2015 रोजी एलईडी खरेदीसंदर्भातील नवीन दरसुची आली होती. यामध्ये एलईडीचा दर 4 हजार 657 रुपये आहे. ही नवीन दरसुची येण्यापूर्वीचे दर 11 हजार 292 रुपयांपर्यंत होते. सदस्य फंडातील आठ कामांमधील 300 एलईडी हे 4 हजार 657 दराने, तर वीस कामांमधील 302 एलईडी 11 हजार 292 रुपये दराने खरेदी केलेले आहेत. नवीन दरसुची असतानाही जादा दराने खरेदी झालेली आहे. त्यातून सुमारे वीस लाख रुपयांची उधळपट्टी झाली असल्याकडे  जितेंद्र पाटील यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.