Tue, Jun 18, 2019 23:08होमपेज › Sangli › एलईडी घोटाळा : १२० ग्रामपंचायतींची चौकशी

एलईडी घोटाळा : १२० ग्रामपंचायतींची चौकशी

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:39PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

एलईडी स्ट्रीट लाईट खरेदी घोटाळाप्रकरणी जादा दराने खरेदी केलेल्या 120 ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 246 ग्रामपंचायतींनी एलईडी खरेदी केले आहेत. त्यापैकी साडेतीन हजाराहून अधिक दराने एलईडी खरेदी केलेल्या 120 ग्रामपंचायती आहेत.  या ग्रामपंचायतींनी केलेली 2 कोटींची एलईडी खरेदी ‘रडार’वर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 25 लाख ते 50 लाख रुपयांची वसुली लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

कुंडलापूर ग्रामपंचायतीने 5 हजार 400 रुपये दराने एलईडी खरेदी केले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात अन्य काही ग्रामपंचायतींनी 1 हजार 900 रुपये ते 2 हजार 300 रुपये दराने खरेदी केले आहेत. एलईडी दरात मोठी तफावत आहे. ग्रामपंचायतीने विद्युत उपअभियंता यांच्याकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता एलईडी खरेदी केली असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी. वसुली करावी, अशी मागणी घोरपडे व डुबुले यांनी केली होती. 

जिल्हा परिषद स्थायी समिती सभा, अर्थ समिती सभा, बांधकाम समिती सभेतही एलईडी खरेदीप्रकरणी चौकशीची मागणी झाली होती. एलईडी खरेदीप्रकरणातील गांभीर्य ओळखून  राऊत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रविकांत आडसूळ यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची माहिती मागवून घेतली. 

साडेतीन हजार ते साडेपाच हजारावर

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षात 246 ग्रामपंचायतींनी एलईडी खरेदी केले आहेत. सरासरी किंमत 3500 रुपये गृहीत धरून त्यावरील दराने खरेदी केलेल्या 120 ग्रामपंचायतींची चौकशी होणार आहे. 120 मधील 44 ग्रामपंचायतींनी 3500 ते 4500 रुपये दराने एलईडी खरेदी केले आहेत. ही खरेदी 54 लाख रुपयांची आहे. 46 ग्रामपंचायतींनी 4500 ते 5500 रुपये दराने एलईडी खरेदी केले आहेत. ही खरेदी 68.28 लाख रुपयांची आहे. 30 ग्रामपंचायतींनी 5500 रुपयांहून अधिक दराने खरेदी केले आहेत. ही खरेदी 74.49 लाख रुपयांवरील दराने आहे. साडेतीन हजार रुपयांवरील एकुण खरेदी 1 कोटी 96 लाख 77 हजार रुपयांची आहे.