Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Sangli › कुसुमताई पाटील यांना साश्रू नयनांनी निरोप

कुसुमताई पाटील यांना साश्रू नयनांनी निरोप

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:51PM

बुकमार्क करा
बांबवडे : वार्ताहर

माजी मंत्री आमदार जयंत पाटील  यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील यांना शनिवारी कासेगाव (ता. वाळवा)येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. वाळवा तालुक्यासह सांगली जिल्हा व राज्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, मान्यवर, पदाधिकारी, नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर कृष्णा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव भगतसिंह पाटील व  जयंत पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. रक्षाविसर्जन सोमवारी ( दि. 1 जानेवारी) सकाळी 10 वाजता कासेगाव येथे होणार आहे.

शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव येथील आझाद विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी आणले.  शोकाकूल वातावरणात अनेक मान्यवर, नातलगांसह हजारो ग्रामस्थांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.  अंत्ययात्रेच्या वेळी आबाल-वृध्द, स्त्री-पुरूषांनी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून अंत्यदर्शन घेतले. दुपारी दीड वाजता कृष्णा नदी तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुरीचे माजी आमदार प्रसादराव तनपुरे, पुण्यातील फत्तेसिंग जगताप, नेवाशाचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,  जनार्दन पाटील,  देवराज पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य,  नातलग व राजारामबापू उद्योग समुहातील पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आरपीआयचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रकाश आवाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम, अजितराव घोरपडे, राजेंद्र देशमुख, वैभव नायकवडी, आमदार मोहनराव कदम, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप  पाटील,  नानासाहेब महाडीक,नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्ते व नेते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.