होमपेज › Sangli › बांबवडेच्या मैदानात जमदाडेची बाजी

बांबवडेच्या मैदानात जमदाडेची बाजी

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:15PMपलूस : प्रतिनिधी   

बांबवडे (ता. पलूस)  येथील  कुस्ती मैदानात महान भारत केसरी  माऊली जमदाडे याने 58 व्या मिनिटाला हरियाना केसरी अजय गुज्जर याला  दुहेरी पट काढीत आस्मान दाखवले. या कुस्तीसाठी पंच म्हणून आमदार विश्‍वजित कदम  व  महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी काम केले.भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचा  आनंद साजरा करण्यासाठी सुरू  करण्यात आलेल्या बांबवडे  येथील ऐतिहासिक कुस्ती मैदानात   लहान- मोठ्या दोनशेवर कुस्त्या खेळविण्यात आल्या.

काटाजोड कुस्तीसाठी प्रसिध्द असलेल्या या मैदानात प्रथम क्रमांकाची  कुस्ती   तासभर  चालली होती. डाव- प्रतिडाव व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या  या  कुस्तीदरम्यान दोनवेळा पावसाने हजेरी लावली. मात्र, भर पावसातही प्रेक्षकांनी या कुस्तीचा मनमुराद आनंद लुटला. ही कुस्ती सुरू असताना दोन्ही पैलवान जखमी झाले होते. मात्र, ही कुस्ती निकालीच झाली पाहिजे, या प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पंचानी भर पावसात ही कुस्ती खेळविली. अखेरच्या टप्प्यात माऊली जमदाडे याने अजय गुज्जरवर ताबा मिळवित त्याचा दुहेरी पट काढीत चितपट केले. ही कुस्ती स्व. डॉ. पतगंराव कदम यांच्या स्मरणार्थ लावण्यात आली होती.

या मैदानात स्व. आर. आर. (आबा) पाटील यांच्या स्मरणार्थ दोन नंबरची कुस्ती लावण्यात आली. बाला रफीक विरुध्द समाधान पाटील यांची कुस्ती बराबेरीत सोडविण्यात आली.तीन नंबरची कार्तिक काटे विरुध्द अक्षय  शिंदे आणि चार नंबरची कुस्ती  गोकुळ आवारे विरुध्द समीर देसाई या कुस्त्या बरोबरीत सोडविल्या. मात्र, या कुस्त्यांमुळे प्रेक्षकांना कुस्तीतील डाव- प्रतिडावांचे दर्शन झाले.याच मैदानात पृथ्वीराज कदम, नाथा पवार, ऋषिकेश जाधव, आकाश पवार, अमोल पवार, जयंत पाटील, महेश साळुंखे या मल्‍लांसह क्रांती साखर कारखान्याच्या मल्‍लांनी चमकदार कामगिरी केली. यातील अनेक मल्‍लांवर प्रेक्षकांनी रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव केला.

मैदानाचे पूजन लक्ष्मण पाटील, लाला पवार, संकपाळ, संभाजी पवार, हणमंत पवार, भास्कर पवार, ताहेर मुल्‍ला, ए. डी. पाटील, पोपटराव संकपाळ यांच्यासह  उत्कर्ष क्रीडा  मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कुस्तीचे निवेदन ईश्‍वरा पाटील, अभिजित कदम, शंकर पुजारी यांनी केले. या मैदानासाठी    जुन्या काळातील वस्ताद, मल्‍ल मोठ्या संख्येने आले होते. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अरुण लाड, किरण लाड, रोहित आर. आर. पाटील, नगराध्यक्ष राजाराम सदामते यांच्यासह  हजारो कुस्तीशौकिन उपस्थित होते.