होमपेज › Sangli › पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून पतीची आत्महत्या

पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून पतीची आत्महत्या

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 11:25PMविटा : प्रतिनिधी 

झोपलेल्या पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार भांबर्डे (ता. खानापूर) येथे घडला. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय जयसिंग बाबर (वय 45 , मूळ गाव सांगोले , ता. खानापूर) असे मृत पतीचे नाव असून त्याची  गंभीर जखमी पत्नी सुजाता हिच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी सुजाताचे वडील जालिंदर शिवाप्पा कणसे यांनी विटा पोलिसांत वर्दी दिली आहे. 

सुजाता बाबर  इस्पितळात अतिदक्षता विभागात दाखल आहेत. तेथे त्यांनी विटा पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्या पती विजय यांच्यासोबत भांबर्डे येथे मारुती शिंदे यांच्या घरात एक महिन्यांपासून राहत आहेत. मुलगी पूजा हिचे गांधीनगर (विटा) येथील पवार यांच्याशी 15 दिवसांपूर्वीच लग्‍न झाले आहे; तर मुलगा बाळू हा जुनागड राजस्थान येथे गलाईच्या कामासाठी असतो. विजय हा मोलमजुरी करीत होता. त्याला अलीकडे दारूचे व्यसन जडले होते. शिवाय मनोरुग्णाप्रमाणे तो सतत बडबडत होता. रविवारी दिवसभर तो सुजाता यांच्याबरोबर भांडण करीत होता. त्यावेळी तो सुजाताच्या चारित्र्यावर संशय घेत ‘मला मारायला तिने मारेकरी घातले आहेत’ अशी बडबडही करीत होता.  रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान जेवण झाल्यावरसुद्धा तो सुजातास शिगीगाळ देत होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सुजाताने नेहमीप्रमाणे घराला आतून कुलूप लावून घेतले आणि ती झोपी गेली. 

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विजय याने अचानक पत्नी सुजाताच्या डोक्यात कुर्‍हाडीचा वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुजाताने आरडाओरडा केला. तसेच दुसरा वार चुकवण्यासाठी उजवा हात आडवा केला असता तिच्या मनगटावर कुर्‍हाडीचा घाव बसला, तर तिसरा वार डाव्या कानावर बसला. त्यांत त्यांचा कान अर्धा तुटला आहे. 

सुजाता यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेर आजुबाजूचे लोक जमा झाले होते. त्यांनी घराचा दरवाजा तोडून जखमी सुजाताला बाहेर काढले आणि उपचारासाठी विट्याकडे आणले. दरम्यान, लोकांनीच सुजाताचे वडील जालिंदर आणि आई नीलाबाई यांना तात्काळ या हल्ल्याची माहिती दिली. 

गंभीर  जखमी सुजाता यांना विट्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे  त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर परंतु स्थिर असल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र पिसाळ यांनी सांगितले. 

दरम्यान सुजातावर वार केल्यानंतर  विजयने घराच्या आतील खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुजाताला घेऊन सगळे नातेवाईक विट्याकडे आले होते .  त्या काळात गावातील पोलिस पाटील पिंटू भिसे हे  घटनास्थळी दाखल झाले. त्यांना विजयचा मृतदेह दोरीला लटकताना दिसला. त्यांनी त्वरित विटा पोलिसाना खबर दिली. त्यानंतर सहाय्यक  पोलिस निरीक्षक धनाजीराव पिसाळ यांच्यासह पोलिस पथक भांबर्डेकडे रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.  अधिक तपास सहाय्यक  पोलिस निरीक्षक पिसाळ करीत आहेत.