Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Sangli › कुपवाडमधील खून अनैतिक संबंधातूनच 

कुपवाडमधील खून अनैतिक संबंधातूनच 

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:08PMकुपवाड : वार्ताहर 

पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्या संबंधातून तिला पळवून नेल्याचा राग मनात धरून पती रमेश सूर्यवंशी याच्यासह चौघा साथीदारांनी सागर भीमराव माळी या  तरूणाचा लाकडी दांडक्याने डोक्यात जोरदार प्रहार करून खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. 

दरम्यान, सूर्यवंशी याने पत्नीचाही खून करण्याच्या उद्देशाने तिला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची कबुली दिली आहे. सूर्यवंशी याने माळीचा खून करून  कृष्णा नदीत शुक्रवारी पहाटे फेकून दिलेला मृतदेह 36 तासांच्या प्रयत्नानंतर कुपवाड पोलिसांना मिळून आला. सूर्यवंशीने त्याच्या पत्नीलाही बेदम मारहाण केली होती. तिलाही ठार करण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी मुख्य संशयित रमेश सूर्यवंशी (वय 40) याच्यासह त्याचे साथीदार विजय मारूती हसबे (वय 32), अरूण शरद भोसले (वय 35, तिघेही रा.कापसे प्लॉट, कुपवाड), विशाल आप्पासाहेब निकम (वय 30,रा. कुपवाड) यांना आज अटक केली. त्यांना न्यायालयाने आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मृत  माळी व संशयित  सूर्यवंशी  दोघेही शेजारी राहत होते. दोघेही  ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. माळी याचे संशयित सूर्यवंशी याच्या पत्नीबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधातून  माळी व सूर्यवंशी यांच्यात काही दिवसांपूर्वी वादावादी झालेली होती. 

दि. 18 फेब्रुवारीरोजी या प्रेमी युगलाने पलायन केले होते. सूर्यवंशी याने पत्नी घरातून गायब झाल्याची फिर्याद कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर सूर्यवंशी व त्यांच्या साथीदारांनी माळी व गायब पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. माळी हा सूर्यवंशीच्या पत्नीसह शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे गुरूवारी (दि.22) रात्री सापडला.

त्यानंतर  सूर्यवंशी  व त्याच्या साथीदारांनी त्या दोघांना तिथेच जबर मारहाण केली. गुरूवारी रात्री दोघांना  रिक्षातून ( एम.एच.09,जे - 5609) कुपवाडमध्ये आणले. सूर्यवंशीने पत्नीला  एका घरात नेऊन  तिला बेदम मारहाण केली. ती जखमी झाली तरीही तिला  डांबून ठेवले होते. त्यानंतर   माळीला रिक्षातून कुपवाड -मिरज रस्त्यावरील शेतात नेले. लाकडी दांडक्याने डोक्यात जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. 

त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने  माळीचा  मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीत फेकून दिला. नंतर  सूर्यवंशी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला. सहाय्यक निरीक्षक भारत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, रमेश जाधव, कृष्णा गोंजारी, नितीन मोरे, नितीन कुरणे यांनी तात्काळ अन्य संशयितांचा  शोध घेऊन त्यांनाही  ताब्यात घेतले.