Thu, Apr 25, 2019 18:45होमपेज › Sangli › कुपवाडची स्वतंत्र नगरपालिकाच करा

कुपवाडची स्वतंत्र नगरपालिकाच करा

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 10:30PM

बुकमार्क करा
कुपवाड : श्रीकांत मोरे                       

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका झाल्यापासून कुपवाड शहरात अनेकांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. पण, कुपवाडवासीयांना अपेक्षित शहराचा विकास झाला नाही. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि आता महापालिकेचा भाग बनूनही कुपवाड शहर विकासाच्या प्रतीक्षेत राहिले आहे. तब्बल 18 वर्षे झाली तरीही महापालिकेच्या माध्यमातून या शहरात भरीव विकास काम झालेले नाही. यामुळे आता कुपवाडची स्वतंत्र नगरपालिका करा, जेणेकरून कुपवाडच्या विकासाला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया आता शहरवासीयांतून तसेच पदाधिकार्‍यांकडून उमटत आहे. 

कुपवाडची नगरपरिषद करा : अण्णासाहेब उपाध्ये 

तत्कालीन कुपवाड ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली. त्यानंतर लगेच राजकीय नेत्यांनी सोयीसाठी महापालिकेत कुपवाडचा समावेश करून शहराचे एकप्रकारचे नुकसान केले आहे. सांगली, मिरजेच्या तुलनेत कुपवाडमधून सर्वात जादा महसूल महापालिकेला मिळतो. असे असूनही राजकीय नेत्यांनी तसेच प्रशासनाने कुपवाड शहरावर अन्यायच केला आहे. शासनाने कुपवाडला महापालिकेतून वगळून स्वतंत्र कुपवाड नगरपरिषद करावी. 

गड्या आपला गावच बरा : -अनिल कवठेकर, अध्यक्ष, व्यापारी संघटना, कुपवाड

कुपवाड या निम शहरी गावाने  प्रथम ग्रामपंचायत नंतर नगरपरिषद आणि आता महापालिका अशी स्थित्यंतरे अनुभवली आहेत. कुपवाडचा महापालिकेत समावेश होऊन 18 वर्षापेक्षा जादा कालावधी लोटला आहे. तरीही कुपवाड शहर विकासापासून वंचित राहिले आहे. कुपवाड ग्रामपंचायत असताना ज्या सुविधा होत्या त्यात नव्याने कोणतीही भर पडलेली नाही. उलट विविध जाचक कराच्या जंजाळात अडकलेल्या नागरिकांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडत आहे. तो म्हणजे  ‘गड्या आपला गावच बरा’. शासनाने याचा विचार करण्याची गरज आहे. नगरपालिका झाल्याखेरीज कुपवाडच्या विकासाला गती मिळणार नाही.  

सांगली मिरजेपेक्षा कुपवाडमधून जादा कर : अभिजित कोल्हापूरे, अध्यक्ष- कुपवाड व्यापारी संघटना.

सांगली, मिरजेच्या तुलनेत कुपवाड शहरातून महापालिकेला जादा कर मिळतो आहे. तरीदेखील  कुपवाडमध्ये विकास कामे झाली नाहीत. मग कुपवाडमधून मिळालेला जादा कर गेला कोठे? हा संशोधनाचा विषय आहे. कुपवाड शहरावर  लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने अन्यायच केलेला आहे.कुपवाडचा विकास होण्यासाठी शासनाने कुपवाडची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची नितांत गरज आहे. 

कुपवाडवर कायम अन्यायच :  रमेश जाधव, उपाध्यक्ष,

कुपवाड व्यापारी संघटना

कुपवाडचा महापालिकेत समावेश झाला. सांगली, मिरजेला आयुक्त वेळ देतात. मात्र आठवड्यातून एकदा कुपवाडला वेळ देण्याचे आश्वासन देऊनही आयुक्त कुपवाडकडे फिरत नाहीत. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या अन्यायापेक्षा कुपवाडची स्वतंत्र नगरपरिषद झालेली बरी.

कुपवाड शहराची अवस्था जुन्या खेड्यासारखी : मोहन जगताप, कुपवाड

कुपवाड शहराचा महापालिकेत समावेश होऊन 19 वर्षे झाली. परंतु कुपवाडची अवस्था आजही एखाद्या जुन्या खेड्यासारखीच आहे. कुपवाडच्या लगतची खेडी सुधारली, परंतु कुपवाड शहर मात्र विकासापासून वंचितच राहिलेले आहे. कुपवाडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासनाने कुपवाडची स्वतंत्र नगरपालिका करावी. कुपवाडसाठी स्वतंत्र नगरपालिका केल्याशिवाय विकासात मागे पडलेल्या कुपवाडच्या चौफेर विकासाला गती येणार नाही.

विकासासाठी सर्वांचे एकत्र प्रयत्न हवेत : योगेंद्र थोरात (राष्ट्रवादी नेते) आज नागरिकांची किरकोळकामेही मिरज पालिका कार्यालयात होत नाहीत. नागरिकांना सांगलीला जावे लागते, अधिकारी गायब असतात. अधिकारी सांगलीला बैठकीला गेलेत, असे सांगण्यात येते त्याला चाप बसेल. तसेच व्यापारी वर्गास ते सोयीचे होईल. मिरज भागात मागासवर्गीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मिरजेसाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होऊ शकेल. मात्र आजची अव्यवस्था पाहता आजूबाजूची गावे महापालिकेत सामील होण्यास विरोध करतील.