Tue, Jun 25, 2019 15:11होमपेज › Sangli › सहायक आयुक्तांना मारहाण

सहायक आयुक्तांना मारहाण

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 11 2019 11:51PM
कुपवाड : वार्ताहर 

कुपवाड शहर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त गौतम भिसे  अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना दोघांनी बेदम मारहाण केली.  त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला.  शाखा अभियंता ए. पी. मगदूम  आणि स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांनाही तलवारीचा धाक दाखवला, अशी तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी रणजित महादेव माहीमकर (वय  22) व विद्या महादेव माहीमकर (वय 46, दोघेही रा. रामकृष्णनगर, कुपवाड) या संशयितांना अटक केली आहे.
श्रीमती पुष्पा चंद्रकांत बागेवाडी (रा. दसरा चौक, कोल्हापूर) यांच्या मालकीची शहरातील रामकृष्णनगर भागात मिळकत आहे. या मिळकतीवर काहींनी अतिक्रमण 
केले असल्याची तक्रार त्यांनी उपायुक्त मौसमी बर्डे यांच्याकडे केली होती.  बर्डे यांच्या आदेशानुसार  सहाय्यक आयुक्त भिसे, अभियंता मगदूम, स्वच्छता निरीक्षक मद्रासी  शुक्रवारी दुपारी पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी संशयित रणजित माहिमकर व विद्या माहिमकर यांना सहाय्यक आयुक्त भिसे यांनी “तुमच्याकडे घर बांधणीचा परवाना आहे का,’’ असे विचारले. त्यावेळी  रणजित याने “ तू मला कोण विचारणारा? ’’ असे म्हणून भिसे यांची कॉलर धरून त्यांना  खाली पाडले. बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. डाव्या हाताच्या कोपरावर मार लागून रक्तस्त्राव झाला. 

दरम्यान, शाखा अभियंता मगदूम व स्वच्छता निरीक्षक मद्रासी भिसे यांना सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी संशयित रणजित शेडमध्ये जाऊन तलवार घेऊन बाहेर आला.मद्रासी व मगदूम यांना त्याने तलवारीचा धाक दाखवला. ते घाबरून पळून जाऊ लागले. तेव्हा त्याने तलवार घेऊन त्यांचा पाठलाग केला. नंतर पुन्हा तो भिसे यांच्याजवळ  गेला आणि त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार पुष्पा व चंद्रकांत बागेवाडी हे दोघे भिसे यांना वाचविण्यासाठी पुढे गेले त्यावेळी रणजित याने त्या दोघांनाही मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. 

   संशयित विद्या माहिमकर यांनी  भिसे यांना शिवीगाळ केली. “ तुम्ही पोलिस स्टेशनला गेला; तर तुमच्यावर विनयभंगाची तक्रार करते’’ असे म्हणून आम्हाला धमकी दिल्याचे भिसे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तपास करीत आहेत.