Sun, Nov 18, 2018 00:44होमपेज › Sangli › वारणा नदीवरील कुंडलवाडी बंधारा धोकादायक

वारणा नदीवरील कुंडलवाडी बंधारा धोकादायक

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:29PMऐतवडे खुर्द : वार्ताहर

चांदोली धरणातून बारमाही वाहणार्‍या वारणा नदीवरील कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील बंधारा मोठा धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी बंधार्‍याच्या भिंती बाजूचा भराव निघून गेल्याने हा बंधारा धोक्याचा इशारा देऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. सध्या कुंडलवाडी बंधार्‍याची मोठी दुरवस्था झाली असून बंधार्‍याची उभी भिंत पडलेली आहे. तर बंधार्‍याच्या दुसर्‍या बाजूस भिंतीचा पाया खचलेला असून बंधार्‍याच्या मध्यवर्ती भागाची ही स्थिती धोकादायक आहे. ठिकठिकाणी बंधार्‍याच्या भिंतीचे असणारे अँगल उघडे पडलेले आहे. तर दोन्ही बाजूचा भराव खचलेल्या स्थितीत आहे. सध्या बंधारे आहेत म्हणूनच ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, देवर्डे, चिकुर्डे आदी भागात वारणा नदीत पाणीसाठा मुबलक प्रमाणात रहात आहे. 

हा बंधारा कोसळल्यास कुंडलवाडी येथील परिसरातील गावात शेतीसह पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याचे चित्र आहे. परंतु या बंधार्‍याची डागडुजी करण्यास संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. लोकप्रतिनिधींनीही या बंधार्‍याकडे पाहणीसुद्धा केलेली नाही. या बंधार्‍याची त्वरित दुरूस्ती मोहीम राबवावी, अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.