Sat, Dec 14, 2019 04:53होमपेज › Sangli › कृष्णा पात्रात; सांगलीने घेतला मोकळा श्वास

कृष्णा पात्रात; सांगलीने घेतला मोकळा श्वास

Published On: Aug 14 2019 12:08AM | Last Updated: Aug 14 2019 12:08AM
सांगली : प्रतिनिधी

गेल्या बारा दिवसांपासून रुद्रावतार धारण केलेला महापूर मंगळवारी ओसरला. शहरात शिरलेले कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात पोहोचले. आयर्विन पुलाजवळ सायंकाळी पाणीपातळी 46.5 फुटांवर पोहोचली होती. मारुती चौक, शिवाजी मंडईसह उपनगरांत मात्र पाणी थांबलेलेच होते. शहराचा बायपास रस्ता वगळता सर्व मार्ग खुले झाले आहेत. महापूर हटल्याने संपूर्ण सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील अनेक गावांनी मोकळा श्वास घेतला. 

सांगलीसह जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून महापूर होता. महापुराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत आयर्विन पुलाजवळ विक्रमी 57.7 फुटांची पातळी गाठली होती. त्यामुळे सुमारे शंभरपेक्षा अधिक गावांत पाणी शिरले होते. अनेक गावे पाण्याखाली गेली होती. सांगली, मिरजेतील अनेक भागातही पाणी शिरले होते. 

42-43 फूट पातळी होताच दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट पासून शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती.  नंतर अर्ध्याहून अधिक सांगलीत पाणी शिरले. त्यामुळे शहराचे सांगली कोल्हापूर रस्ता, शिवशंभो चौकात व टिळक चौकात पाणी आल्यामुळे सांगली -इस्लामपूर रस्ता बंद झाला होता.   कर्नाळ रस्ताही बंद झाला होता. 

अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची आर्थिक उलाढालही ठप्प झाली होती. सुमारे चार लाखांहून अधिक लोकांना फटका बसला होता. ब्रह्मनाळ येथे होडी उलटून महापुरात 16 जणांचे बळी  गेले. सांगलीतही पुरात चारजणांचे बळी गेले. मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जिल्ह्याचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

पूर परिस्थितीत मदत-आणि पुनर्वसनासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन, सैन्यदल, नौदल, एनडीआरएफच्या जवानांसह सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. तसेच लोकांचे विविध केंद्रांमध्ये स्थलांतर करून त्यांची निवारा, भोजनाची सोय केली.पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघही सुरू आहे.

परंतु गेल्या चार दिवसांपासून पूर ओसरत गेला. त्यानुसार हळूहळू जनजीवन सुरळित होऊ लागले. सांगलीत गेल्या दोन दिवसांत पूर हटल्याने अनेक भागातील नागरिक घरी परतू लागले आहेत.