होमपेज › Sangli › कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले

कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 11:53PMसांगली/पाटण : प्रतिनिधी

कोयना व चांदोली धरणांतून पाणी सोडणे सुरूच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढले आहे. नदीकाठाला दक्षतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिली.गेल्या दोन दिवसांपासून कोयना, महाबळेश्‍वर, नवजा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. पावसाळा अद्याप अद्यापही दीड महिना असल्याने पुढील येणारे पाणी गृहीत धरून कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारपासून 27 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. बुधवारी सायंकाळी तो 50 हजार क्युसेक करण्यात आला. गुरुवारी, शुक्रवारी यात काही प्रमाणात वाढ करण्यात आली. सद्यःस्थितीत कोयना धरणातून 43 हजार 612 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. दरम्यान, मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. धरणात 101.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळेच आता धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होत आहे, त्याच पटीत पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय 

सिंचन विभागाने घेतला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर गुरुवारी धरणाचे दरवाजे सहा फुटांनी उचलण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा मंदावला आणि त्यामुळे पाण्याची आवकही थोड्या प्रमाणात घटल्यानंतर हेच दरवाजे पाच फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत. यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या दोन दिवसात बहे, ताकारी, भिलवडी, सांगली, अंकली पुलाजवळ पाणी पातळी पाच ते सात फूट वाढली. आज दिवसभरात पाणी तीन ते चार फूट वाढले. काही ठिकाणी पाणी वाढल्याने अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी बुडल्या आहेत. तसेच पोटमळीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.