Tue, Jul 16, 2019 10:11होमपेज › Sangli › सांगली : कोथळे बंधूंचा आत्मदहनाचा प्रयत्न

सांगली : कोथळे बंधूंचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करा अशी मागणी करीत त्याचे भाऊ आशिष आणि अमित या दोघांनी मंगळवारी सकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यासमोरच रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.  अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके आणि पोलिसांनी आत्मदहनाचा  तो प्रयत्न हाणून पाडला. सुमारे अर्धा तास हा थरार भर रस्त्यावर सुरू होता. 

दरम्यान,   कोथळे कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यासमोर चार तास ठाण मांडून आंदोलन केले. त्यांचे म्हणणे असे ः आमचा सीआयडी तपासावर विश्‍वास नाही. अनिकेतचा पोलिस कोठडीत मृत्यू होऊन 20 दिवस झाले तरी आम्हाला ठोस माहिती मिळत नाही. सीआयडीचे अधिकारी तपासाला मुद्दाम उशीर लावत आहेत. पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे द्यावा. सीआयडीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी आंदोलस्थळी जाऊन कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांची  समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अनिकेतचा भाऊ आशिष खून प्रकरणाच्या तपासाबाबतची माहिती घेण्यासाठी आज सकाळी सीआयडी कार्यालयात गेला होता. मात्र, त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित माहिती मिळाली नाही. त्यामुळे तो आणि त्याचा भाऊ अमित यांनी पोलिस ठाण्यासमोर पेटवून घेऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा तिथे दिला होता. त्याची कल्पना पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना सव्वाबाराच्या दरम्यान देण्यात आली. त्यांनी ही माहिती तातडीने शहर पोलिस निरीक्षक शेळके यांना दिली. अप्पर पोलिस अधीक्षक बोराटेही पोलिस ठाण्याकडे गेले. शेळके यांच्यासह सर्व पोलिस  पोलिसठाण्याच्या  गेटवर उभे राहिले होते. त्यावेळी आशिष व अमितसह चार-पाच युवक दुचाकीवरून प्रतापसिंह उद्यानासमोर आले. पोलिसांना पाहताच दोघांनीही अंगावर रॉकेल ओतून घेण्यास सुरुवात केली. बोराटे, शेळके यांच्यासह पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोघांनाही पकडले. त्यांच्याकडील रॉकेलचा कॅन काढून घेतला. आशिष, अमित आणि पोलिस यांच्यात झटापट सुरू होती. त्यात अधिकार्‍यासह काही कर्मचार्‍यांच्या अंगावरही रॉकेल उडाले. त्यानंतर  दोघांनाही शहर पोलिस ठाण्यासमोर आणण्यात आले. 

 तोपर्यंत सर्वच कोथळे कुटुंबीय पोलिस ठाण्यासमोर आले होते.   सीआयडीचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णीही त्या ठिकाणी आले. 

कोथळे कुटुंबियांनी प्रश्‍नाची सरबत्ती करीत पोलिसांना धारेवर धरले. आम्ही आता कोणावरही विश्‍वास ठेवणार नाही. आमचा कोणावरही विश्‍वास नाही. आम्ही या ठिकाणीच मरतो. आम्हाला सीआयडीकडून तपासाबाबतची माहिती मिळत नाही. पोलिसांकडून हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे द्या अशा मागण्या कुटुंबीय करीत होते. सर्वपक्षीय कृती समिती, पोलिस अधिकारी  यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सीआयडीचे अधीक्षक  पाठक यांच्याबरोबर तुमची चर्चा घडवून सर्व माहिती देतो, असे सांगितल्यानंतर  कुटुंबीय शांत झाले. 

दुपारी तीनच्या सुमारास पाठक  शहर पोलिस ठाण्यात आले. कोथळे कुटुंबियांबरोबर त्यांनी स्वतंत्र चर्चा केली. यावेळी कृती समितीचे सदस्यही उपस्थित होते. पाठक म्हणाले, सीबीआयकडे तपास देण्याबाबत मी काही सांगू शकणार नाही, मात्र सीआयडीने केेलेल्या तपासासाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईन. यामध्ये कोणालाही क्‍लिनचीट मिळणार नाही. तपास योग्य दिशेने सुरू आहे. झालेल्या तपासाबाबत आढावा घेऊन त्याची माहिती मी देतो, असे आश्‍वासन दिल्यानंतर कोथळे कुटुंबीय शांत झाले आणि चारच्या सुमारास घरी गेले. त्यामुळे त्या ठिकाणी थांबून असलेल्या पोलिसांनी निश्वास टाकला.   

मुख्यमंत्र्यांना डॉ. काळेंना  भेटायला वेळ कसा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येतात. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याबरोबर चर्चा करतात. मात्र गृहखाते त्यांच्याकडे असूनही कोथळे कुटुंबियांशी बोलायला त्यांना वेळ नाही. हा सर्व प्रकार म्हणजे हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कोथळे कुटुंबियांनी केला.

आमच्या आत्महदहनाला मुख्यमंत्रीच जबाबदार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सर्व कुटुंबीय आत्मदहन करू.   त्याला जबाबदार मुख्यमंत्रीच असतील . कारण त्यांच्याकडेच गृहखाते आहे. तरीही ते सीबीआय चौकशीसाठी काहीही प्रयत्न करीत नाहीत आणि त्याबाबत काही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत आम्हाला शंका आहे, असा आरोप आशिष कोथळे याने केला.