Thu, Jul 18, 2019 13:05होमपेज › Sangli › भिडे यांच्या चौकशीसाठी पुणे पोलिस सांगलीत

भिडे यांच्या चौकशीसाठी पुणे पोलिस सांगलीत

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 23 2018 12:33AMसांगली : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक गुरुवारी येथे दाखल झाले. या पथकाने शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्यासह काही कार्यकर्त्यांकडे कसून चौकशी केली. त्यांचे जबाब घेतले. दरम्यान, तपासासाठी आलेल्या दोन अधिकारी व अठरा कर्मचार्‍यांच्या पथकाने  या चौकशीबाबत  गोपनीयता बाळगली आहे.  

कोरेगाव-भीमा येथे दि. 1 जानेवारी रोजी घडलेल्या घटनांचे  पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळी अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडलेे. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी   एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. तर  भिडे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नव्हती. भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी दि. 26 मार्चला मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय  दोन दिवसांपूर्वी भिडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन, दंगलीला प्रकाश आंबेडकर जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

त्यासाठी शिवप्रतिष्ठाननेही दि. 28 मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिमोर्चा काढणार असल्याचा  इशारा  दिला आहे.  त्या पार्श्‍वभूमीवर  तब्बल अडीच महिन्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज येथे दाखल झाले. विश्रामबाग पोलिस मुख्यालय परिसरात हे  पथक रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. पथकाने दिवसभरात स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शिवप्रतिष्ठान या संघटनेबद्दल माहिती घेतली. कोरेगाव-भीमा दंगल होण्यापूर्वी व दंगलीनंतर भिडे कुठे होते, याची गुप्त माहितीही पथकाने घेतली. त्याशिवाय प्रतिष्ठानचे कार्यवाह चौगुले यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब घेतला. त्या शिवाय आणखी काही कार्यकर्त्यांची चौकशी केल्याचे येथील एका कर्मचार्‍याने सांगितले. 

Tags : Sagli, Sangli News, Koregaon Bhima issue, for Bhide, investigation, Pune Police, in Sangli