होमपेज › Sangli › कोंत्याव बोबलादमध्ये जोरदार राडा

कोंत्याव बोबलादमध्ये जोरदार राडा

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 11:58PMसांगली/ जत : प्रतिनिधी/ वार्ताहर

कोंत्याव बोबलाद (ता. जत) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून दोन गटांत तुफान राडा झाला. दोन्ही गटांच्या समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ करत दगड, काठीने बेदम मारहाण केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. शिवाय, बोलेरो गाडीची तोडफोडही करण्यात आली. यामध्ये दोन्ही गटांचे सात जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.  आमदारपुत्रासह नऊ जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांच्या मिळून 18 जणांविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीशैल सेदाप्पा कांबळे (वय 42) यांच्या फिर्यादीनुसार आमदारपुत्र मनोज विलासराव जगताप, रमेश एकनाथ जगताप, तुकाराम प्रकाश जगताप, नवनाथ उत्तम जगताप, शिवाजी यशवंत जगताप, धैर्यशील चंद्रहास जगताप, अमर चंद्रहास जगताप, गोपाळ बाळकृष्ण जगताप, कुलदीप जनार्दन जगताप यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ, दमदाटीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 मनोज विलासराव जगताप (वय 42) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी भिवा करे, महेश भिवा करे, मुरलीधर सुबराव जगताप, शंकर मारुती सावंत, गणपती सर्जेराव जगताप, श्रीशैल सेदाप्पा कांबळे, पुंडलिक बसाप्पा कांबळे, गणपती महादेव जगताप, बाळासाहेब सर्जेराव जगताप यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि बोलेरो गाडीच्या तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
श्रीशैल कांबळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे ः कोंत्याव बोबलाद येथील ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 

मनोज जगताप यांच्यासह त्यांचे समर्थक सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार श्रीशैल कांबळे यांच्या घरी गेले. त्यावेळी ‘आमच्या उमेदवाराविरोधात तू निवडणूक लढवत आहेस’ असे म्हणून त्यांचा चुलतभाऊ पुंडलिक कांबळे यांच्या घरात घुसले. त्यानंतर त्यांचा पुतण्या माणिक याला काठी, बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील सेदाप्पा व श्रीशैल यांना जातीवाचक शिवागाळ करून त्यांना बेदम मारहाण कऱण्यात आली. यामध्ये श्रीशैल कांबळे, माणिक कांबळे, भिमाण्णा कांबळे, सेदाप्पा कांबळे जखमी झाले आहेत.  

मनोज जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की  ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून श्रीशैल कांबळे यांच्यासह संशयितांनी त्यांच्या बोलेरो गाडी (एमएच 13 एझेड 3627) वर दगडफेक केली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर गोपाळ जगताप, कुलदीप जगताप, शिवाजी जगताप यांना गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. त्यानंतर मुरलीधर जगताप याने मनोज यांना मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली तसेच शिवाजी करे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. 

दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार अठराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे, उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या कोंत्याव बोबलाद येथे तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात आले. 

Tags : sangli, Kontov Bobalad, Gram Panchayat election, dispute, sangli news,