होमपेज › Sangli › कोल्हापूर-बिदर रेल्वे महिनाअखेर सुरू होणार

कोल्हापूर-बिदर रेल्वे महिनाअखेर सुरू होणार

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:20PMलिंगनूर : प्रवीण जगताप

कोल्हापूर ते बिदर (कर्नाटक) दरम्यान आठवड्यातून एकदा रेल्वेसेवा सुरू होणार आहे. दि. 30 मेपर्यंत ही सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. दि. 16 मेपर्यंत ही सेवा सुरू होईल, अशी आशा असताना ती दि.30 मेपर्यंत सुरू होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

एकीकडे पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा, कर्नाटक व आंध्रप्रदेश यांना जोडणारी एक रेल्वे सुरू होत असताना, पंढरपूर ते निजामाबाद, पंढरपूर ते अकोला या दोन रेल्वे गाड्या नुकत्याच बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. तर कोल्हापूर- नागपूर रेल्वेसेवा दररोज करणे, कोल्हापूर-लातूर-बिदरमार्गे हैद्राबाद तिरूपती अशा रेल्वेसेवा सुरू करणे या मागण्यांनाही कोलदांडा मिळाला असल्याच्या तीव्र भावना मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे नेते शिवाजी नरहरे यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्त केली आहे. 

कोल्हापूर ते बिदर अर्थात बिदर ते कोल्हापूर या ट्रेनकरिता बिदरचे खासदार बसवंत खुबा यांनी मोठा पाठपुरावा केला आहे, अशीही माहिती नरहरे यांनी दिली. या रेल्वेबाबत अद्याप पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात फारशी माहिती नसली तरी ही सेवा बिदर व मराठवाड्यातील रेट्यामुळेच सुरू होण्याचे संकेत आहेत. 

या रेल्वेसेवेमुळे मराठवाडा, कर्नाटकातील भाविकांना श्री विठ्ठल तीर्थक्षेत्र पंढरपूर व महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे जाण्याकरिता जलद सोई तयार होत आहेत. मात्र इतर जिल्ह्यातील खासदारांनीही मध्य रेल्वेच्या इतर मागण्यांकरीता रेटा लावण्याची गरज आहे.

अकोला ते पंढरपूर या सहाशे किलोमीटर अंतराच्या नवीन लाईनच्या रेल्वेकरिता 1200 कोटी रुपयांचा खर्च करून सुरू केलेली रेल्वे बंद करीता मोठा अन्याय प्रवासी व भाविकांवर केला आहे. पंढरपूर व शेगाव गजाननबाबा तीर्थक्षेत्राला जोडणार्‍या रेल्वेबाबत हा निर्णय घाईचा ठरल्याचा आरोपही नरहरे यांनी यावेळी केला. 

अशी असेल संभाव्य कोल्हापूर - बिदर रेल्वेसेवा : 

आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी ही रेल्वे धावण्याची शक्यता आहे. या रेल्वेचा क्रमांक 11015 व 11016 असा राहणार आहे. रेल्वे बोर्डाकडून आगामी तारीख मे एंडपर्यंत सेवा सुरू होईल अशी आहे. बिदरच्या खासदारांच्या प्रयत्नाने ही सेवा सुरू होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील खासदारांचे मात्र नव्या रेल्वेसेवा सुरू करण्याचे दुरच राहिले पण आहेत त्या सेवा बंद होत असल्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटना संघर्ष संघटना यांच्यातून होत आहे.