Wed, Feb 20, 2019 02:34होमपेज › Sangli › सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला

सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील मार्केट यार्डमध्ये भांडण करू नका, असे सांगणार्‍या हॉटेलचालक दोन सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह तिघे जण जखमी झाले आहेत. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. 

सिद्राम गणपती पाटील (वय 38), खंडोबा गणपती पाटील (वय 35, दोघेही रा. हनुमाननगर) अशी जखमी भावांची नावे आहेत. यामध्ये पाटील बंधूंच्या मारहाणीत राहुल यल्लाप्पा पवार (वय 15, रा. माकडवाले गल्ली) जखमी झाला आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मार्केट यार्डमधील सेवागृहासमोर पाटील बंधूंचे सिद्धेश्‍वर नाष्टा सेंटर आहे. सायंकाळी चारच्या सुमारास माकडवाले गल्ली परिसरातील तिघेजण त्यांच्या हॉटेलसमोरील एका आंबा विक्रेत्याला मारहाण करीत होते. हल्लेखोरांनी त्याला मारत-मारत पाटील यांच्या हॉटेलपर्यंत आणले. हॉटेलमध्ये येऊन विक्रेत्याला ते मारहाण करीत असताना सिद्राम यांनी त्यांना येथे भांडण करू नका असे सांगितले. याचा राग आल्याने हल्लेखोरांनी विक्रेत्याला सोडून दिले. आणि पाटील बंधूंच्या दिशेने धाव घेतली. 

तीनही संशयितांनी चाकूने दोन्ही बंधूंवर वार केले. वार चुकविताना दोघांच्याही डाव्या हाताला तसेच डोक्यात चाकूचे वार बसले आहेत. त्याशिवाय यातील एकाने दगडानेही मारहाण केल्याचे सिद्राम पाटील यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राहुल पवार व पाटील बंधूंना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. दरम्यान यावेळी पाटील बंधूंनी पाण्याच्या जगने तसेच चाकूने मारहाण केल्याचे राहुलने सांगितले. त्यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

Tags : sangli, sangli news, Knife attack, two brother,