Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Sangli › कडेगाव मैदानात किरण भगतची रवीकुमारवर मात

कडेगाव मैदानात किरण भगतची रवीकुमारवर मात

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 8:40PMकडेगाव : शहरप्रतिनिधी

कडेगावच्या कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याने  हरियाणाच्या रवीकुमार याला नवंदर काढून घिस्सा डावावर अवघ्या पाचव्या मिनिटात अस्मान दाखवून प्रतिष्ठेचा विश्‍वजीत कदम केसरी किताब पटकावला. शौकिनांच्या  डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या या  मैदानात   माऊली जमदाडे याने रशियन मल्ल   पाव्हलो सिडोरेंन्को याच्यावर आणि  बाला रफिक शेख याने  रशियन मल्ल  मायखेलो डटसेन्को याच्यावर मात करून विजय मिळवला.  

कडेगाव येथे अभिजित (दादा) कदम कुस्ती संकुलात माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. मैदानात सातार्‍याचा  उपमहाराष्ट्र  केसरी किरण भगत आणि हरियाणाचा रवी कुमार यांच्या लढतीत  किरणने काही क्षणातच रविकुमारवर  कब्जा घेतला. पाचव्याच मिनिटात किरणने नवंदर काढून घिस्सा डावावर रविकुमार याच्यावर  बाजी मारली.   दुसर्‍या कुस्तीत माऊली जमदाडेने  पावलो सिडोरेंन्को याला नावंदर काढून घिस्सा डावावर चितपट केले. तो  आमदार डॉ. पतंगराव कदम केसरी किताबाचा मानकरी ठरला. बाला रफिक शेख याने मायखेलो डटसेन्को याला  काही क्षणातच हप्ती डावावर अस्मान दाखवले.  रफिकने  आमदार मोहनराव कदम केसरी किताब पटकाविला .

आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्‍वजीत कदम, करमाळ्याचे  आमदार नारायण पाटील, युवा नेते डॉ. जितेश कदम, महेंद्र लाड, नामदेवराव मोहिते, सोनहिराचे संचालक दीपक भोसले, कार्यकारी संचालक शरद कदम, भाऊसाहेब यादव, ए. डी. पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, उपनगराध्यक्ष साजिद पाटील, विजय शिंदे, अविनाश जाधव, दिनकर जाधव, प्रकाश जाधव, सुनील जगदाळे, उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळी, कमलाकर चौगुले, विजय मोहिते आदी उपस्थित होते.