Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Sangli › इस्लामपुरात रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्‍ला

इस्लामपुरात रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्‍ला

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:39PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते व कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांचे समर्थक गणेश हौसेराव शेवाळे (वय 36 रा. बहे, ता. वाळवा) यांच्यावर मंगळवारी रात्री येथे अज्ञातांनी प्राणघातक हल्‍ला केला. लोखंडी रॉड व दगडाने झालेल्या मारहाणीत शेवाळे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात अनोळखी 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : शेवाळे  मंगळवारी  रात्री पेठ - सांगली रस्त्यावरील आष्टा नाक्याजवळील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. रात्री ते जेवण करून बाहेर आले. रस्त्यावर थांबलेेल्या 10 ते 12 जणांनी  शेवाळे यांना बाजूला नेऊन  शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. एकाने लोखंडी रॉडने त्यांच्या खांद्यावर व डोक्यात जोराचा प्रहार केला. इतरांनी दगड व विटांनी मारहाण केली. शेवाळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे मित्र मदतीला धावले. त्यामुळे मोरकर्‍यांनी तेथून पळ काढला. जखमी शेवाळे यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेवाळे यांनी दिलेल्या  फिर्यादीत म्हटले आहे की, इसार पेट्रोल पंपाचा मॅनेजर व त्याच्या साथीदारांनी मला मारहाण केली. यावेळी माझा मोबाईल व 8 हजार रूपयेही गहाळ झाले आहेत.पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात 12 जणांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विश्‍वास सोळोखे अधिक तापस करीत आहेत.