Sun, Aug 18, 2019 21:25होमपेज › Sangli › खरसुंडीत श्री सिध्दनाथ यात्रा उत्साहात

खरसुंडीत श्री सिध्दनाथ यात्रा उत्साहात

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:26AMआटपाडी : वार्ताहर

श्री सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात आणि गुलाल व खोबर्‍याची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत   खरसुंडी(ता.आटपाडी)  येथील श्री सिध्दनाथांच्या चैत्री यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला.पारंपारिक वाद्यांसह ढोल- ताशांच्या गजरात गुलालाच्या उधळणीत अवघी नाथनगरी न्हाऊन निघाली.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री सिध्दनाथ देवस्थान आहे.या चैत्री यात्रेला दि. 8 एप्रिलपासून सुरवात झाली होती.त्यादिवशी श्रीनाथ-जोगेश्‍वरीचा विवाह सोहळा मोठ्या भक्‍तीमय वातावरणात संपन्‍न झाला. यात्रेच्या मुख्य दिवशी विविध भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.याशिवाय गुरूवारपासूनच भाविक नाथनगरीत दाखल होऊ लागले होते.तसेच मुख्य मंदिर परिसरातील बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यात आल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.पहाटे श्री सिध्दनाथांची पुजा करण्यात आली. तेव्हापासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती.विविध गावातील सासनकाठ्या मंदिराच्या आवारात दाखल झाल्या होत्या. पारंपारिक वाद्यांच्या तालावर भाविक भर उन्हात सासनकाठया नाचवत होते.उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही भाविकांमध्ये मोठा उत्साह होता.
दुपारी श्री सिध्दनाथांची पालखी मंदिरातून बाहेर येताच भाविकांनी गुलाल व खोबर्‍याची मोठ्या प्रमाणात उधळण केली.भाविकांनी ‘श्री सिध्दनाथांच्या नावानं चांगभलं’ असा जयघोष केला.मुख्य बाजारेपेठेतून पालखी जोगेश्‍वरी मंदिराजवळ येताच सासनकाठ्या पालखीस भिडवण्यात आल्या.

ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच श्री नाथदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेत पिण्याचे पाणी, दर्शन व सावलीची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.यात्रेत काही ठिकाणी मोफत पाणी , सरबत वाटप करण्यात येत होते.
 जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती.गावापासून काही अंतरावर झरे, नेलकरंजी, आटपाडी, बलवडी या मार्गावर वाहन पार्किगची व्यवस्था केली  होती. प्रत्येक  मार्गावर वाहने अडविल्याने भाविकांना ये-जा करणे सोपे झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त  होता. आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेत पथके तैनात करण्यात आली होती.गुलाल, खोबरे, मिठाई, खेळणी, संसारोपयोगी वस्तू यांची  दुकाने भरपूर  होती.

Tags :Khrusundit, Shri Siddhant ,Yatra excited,sangli news