Tue, May 21, 2019 18:12होमपेज › Sangli › जिल्ह्याच्या पूर्वभागात खरीप हंगाम धोक्यात

जिल्ह्याच्या पूर्वभागात खरीप हंगाम धोक्यात

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 11:48PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर,  जत आणि तासगाव (पश्‍चिम भाग) तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 25 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. काही शेतकर्‍यांनी अद्याप पेरणी केलेली नाही. पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. 

दरम्यान कमी  आणि उशिरा पाऊस झाल्यास पेरणीबाबत शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे. हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण होते. त्यानुसार वेळेवर पावसाला सुरूवातही झाली होती. 

दि. 6 जुलैपर्यंत वाळवा, शिराळा, तासगाव पूर्व भाग आणि मिरज या तालुक्यांच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. त्यानुसार 80 ते 90 टक्के पेरण्या पूर्ण  झाल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र बिकट स्थिती आहे. एकूण सरासरीपेक्षा 50 टक्के पाऊस कमी  झाला आहे. पुरेसा पाऊस नसल्याने या भागात अनेकांनी अद्याप पेरणी केलेली नाही. ज्यांनी केली. त्यांच्यावर दुबार पेरणी कऱण्याची वेळ आली आहे.     

अपुर्‍या आणि उशिरा  पावसाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उशिरा पेरणी करावयाची झाल्यास  जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा.   त्यामुळे एक- दोन पिकांचे तरी  उत्पादन मिळेल.

जमिनीतून बाष्पीभवन होऊन पाणी हवेत उडून जाते.  त्यामुळे जमिनीतील ओल कमी होत. ते टाळण्यासाठी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीच्या वरच्या थरातून होणारे बाष्पीभवन कमी होईल आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होईल. शिवाय तणांचे प्रमाण जास्त असल्यास   पिकांच्या बरोबरीने पाणी शोषण केले जाईल.  कोळपणीतून तण नियंत्रण केल्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. 

पावसात खंड पडल्यास पिकांची वाढ थांबते. पिकांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते, मुळाद्वारे पाणी, अन्नद्रव्य शोषण्याची क्रिया मंदावते. अशा परिस्थितीत नंतर पाऊस झाल्यावर पुन्हा ही क्रिया त्वरित पुर्ववत सुरू होण्यासाठी पिकावर थोड्या युरियाची फवारणी करावी. यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते आणि मुळ जमिनीतून अन्नद्रव्य, पाणी शोषून घेण्यास योग्य होतात. जमिनीच्या पृष्ठभागावर पिकांच्या ओळीमध्ये  आच्छादनचा वापर करावा. पीक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर कारवा.