Mon, Feb 18, 2019 03:45होमपेज › Sangli › सत्तारूढ आमदारांकडून पालकमंत्री धारेवर

सत्तारूढ आमदारांकडून पालकमंत्री धारेवर

Published On: Apr 09 2018 1:40AM | Last Updated: Apr 09 2018 1:40AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाहीत. पाणी असतानाही पिके वाळत आहेत. त्यांनी काय तारेवर आकडा टाकायचा काय? निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई कधी मिळणार? रिक्‍त जागा कधी भरल्या जाणार, आदी प्रश्‍न विचारत पालकमंत्री सुभाष देशमुख यांना आज भाजप, शिवसेनेच्याच आमदारांनी धारेवर धरले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठक झाली. त्यात भाजपचे आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर मंत्री देशमुख यांनी प्रश्‍न सोडवण्याबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. सरकारच्या पातळीवरही पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील,  कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे आदी उपस्थित होते.

आमदार बाबर यांनी सुरुवातीलाच निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 1 कोटी 70 लाख कधी मिळणार, अशी विचारणा केली. ही कंपनी अद्यापही बियाणे विकत असल्याचे सांगितले. दहा-दहा मिनिटांला वीज जात आहे. फ्युजा, ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर शेतकर्‍यांनाच पैसे गोळा करून भरावे लागत आहेत. महावितरणच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष आहे, असे म्हणणे मांडले. 

आमदार खाडे म्हणाले, शेतकर्‍यांना आता पाणी आहे. पीक चांगले आहे. मात्र वीज कनेक्शन नसल्याने पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत  पिके जळू लागली आहेत. 2013 पासून मागणी असलेल्या शेतकर्‍यांना अद्याप कनेक्शन मिळालेली नाहीत. इतर जिल्ह्यात मात्र 2016 पर्यंत अर्ज केलेल्या कनेक्शन मिळालेली आहेत. शेतकर्‍यांनी आता काय तारेवर आकडा टाकायचा काय? महावितरणचे अधीक्षक अभियंत्यापासून विविध पदे रिक्त आहेत, ती कधी भरली जाणार, असा सवाल केला. 

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील 35 गावांना गावठाण मधून विद्युत पंपाना वीज मिळत नाही. नवीन कनेक्शन मिळत नाही. लोकांनी पाण्यासाठी काय करायचे. जून महिन्यात वीज, बियाणे, खते हे प्रश्‍न गंभीर असणार आहेत. त्याबाबत आताच काळजी घ्यावी.

दरम्यान, मंत्री देशमुख यांनी विविध प्रश्‍नासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह कृषी विषयक विविध योजनांची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी. ज्या भागात जी पिके पिकतात त्यानुसार खरेदी केंद्रे सुरू करावीत.  यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे बियाणे, खतांचा पुरवठा करावा. पीक कर्जाचे वितरण करावे.  शेतकर्‍यांची हेतुपुरस्पर अडवणूक आणि फसवणूक करणार्‍या निविष्ठा विक्रेत्यांची,   कंपन्यांची गय करू नका, असाही  इशारा त्यांनी दिला.

यावेळी  खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा  आढावा घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी  स्वागत केले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले.