सांगली : प्रतिनिधी
पूरसदृश स्थिती आणि गणेशोत्सवाच्या तयारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा. त्यासाठी तत्काळ यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव तयार करा, असे आदेश नूतन महापौर सौ. संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले. निवडीनंतर पदभार स्वीकारण्याची औपचारिकता बाजूला ठेवून मंगळवारी तत्काळ त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर, सभागृहनेते युवराज बावडेकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, विठ्ठल खोत आदींसह सर्व विभागप्रमुख, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सौ. खोत, श्री. सूर्यवंशी व श्री. बावडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे. परंतु माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्तचा दुखवटा सप्ताह संपल्यानंतर ते दि. 27 ऑगस्टरोजी मिरवणुकीने औपचारिक पदभार घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी वेळ न दवडता विकासकामे आणि त्यादृष्टीने नियोजनासाठी अधिकार्यांची बैठक घेऊन काम सुरू केले.
पावसाळा सुरू असून, कोयना, वारणा धरणे भरली आहेत. यामुळे धरणातून नदीत विसर्ग सुरू आहे. नदीची पाणीपातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत सौ. खोत यांनी नियोजनासाठी आवश्यक दोन बोटी तत्काळ खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, गणेशोत्सव पुढील महिन्यात सुरू होणार आहे. यासाठी मूर्ती विक्री स्टॉल, सार्वजनिक मंडळांची तयारीही सुरू झाली आहे. मिरवणूक, विसर्जनाची तयारी याचाही त्यांनी आढावा घेतला. या काळात स्वच्छतेबाबत योग्यती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश सौ. खोत, सूर्यवंशी यांनी दिले.
बावडेकर म्हणाले, गणेशोत्सव काळात भाविकांना ध्वनीक्षेपकावरून योग्य ती माहिती देण्याची व्यवस्था ठेवा. विसर्जन आणि निर्माल्य कुंड याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. सामाजिक संस्थांचा याकामात सहभाग वाढविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. रस्ते खोदाईला पर्याय करण्याच्या तसेच शहरातील कचरा वेळेत हटविण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.