होमपेज › Sangli › नियोजित ड्रायपोर्टसाठी रांजणीची जागा योग्य

नियोजित ड्रायपोर्टसाठी रांजणीची जागा योग्य

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 11:52PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

नियोजित ड्रायपोर्टसंदर्भात  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि  केंद्र शासनाच्या सल्लागार संस्थेच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी रांजणी येथे नियोजित  जागेची पाहणी केली.  ही जागा ड्राय पोर्टसाठी योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र अहवाल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  खासदार संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, तहसीलदार शिल्पा ठोकडे, रांजणीचे सरपंच विजयराव कुलकर्णी, पंचायत समितीचे सभापती मनोहर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाके, भाजप नेत्या नीता केळकर, हायूम सावनूरकर, बाजार समितीचे सभापती दादासाहेब कोळेकर, अनिल लोंढे, अण्णासाहेब जाधव, उद्योगपती माधवराव कुलकर्णी आदि उपस्थित होते.

पोर्ट ट्रस्टचे व्यवस्थापक एन. ए. देशपांडे, सहव्यवस्थापक आर. बी. जोशी, केंद्र शासन नियुक्त सल्लागार संस्थेचे अधिकारी यांच्या पथकाने    गावालगतच्या शंभऱ एकर गायरान जागेची पाहणी केली. 
तेथील जमिनीची प्रत, सलगता आणि भौगोलिक बाबी पाहण्यात आल्या. त्याचबरोबर या जागेसाठी जोडला जाणारा रस्ता मुख्य रस्त्यांपासून किती अंतरावर आहे,  या जागेपासून रेल्वे स्थानक किती अंतरावर आहे, याचीही पाहणी करण्यात आली.  कवठेमहांकाळ रेल्वे स्थानक आणि गावाशेजारी  असलेल्या 80 एकर गायरान जागेचीही पथकाने पाहणी केली. मेष पैदास केंद्रालगत असलेल्या जागेचीही पाहणी करण्यात आली.

ड्रायपोर्टच्या माध्यमातून विकासास चालना मिळणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर , बेळगाव आणि विजापूर  येथील मका, बेदाणा, कच्ची व पक्की साखर, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला  यांच्या निर्यातीसाठी या ड्रायपोर्टचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. ड्रायपोर्टच्या जोडीला खाद्य प्रक्रिया औद्योगिक वसाहत, मोठे कमोडिटी मार्केट उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पाटील यांनी सांगितले. रांजणी येथील जागा ड्रायपोर्टसाठी योग्य असल्याचे नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी प्रथमदर्शनी मान्य केले. जमीन सलग आणि कठीण  असल्यामुळे कमी खर्चामध्ये पोर्टची उभारणी शक्य आहे. त्याचबरोबर रस्ते आणि रेल्वेची सुविधा असल्याचेही त्यांनी सांगितले.