Fri, Feb 28, 2020 16:29होमपेज › Sangli › नागपूर-गुहागर मार्गासाठी जमीन देणार नाही

नागपूर-गुहागर मार्गासाठी जमीन देणार नाही

Published On: Dec 18 2017 2:42AM | Last Updated: Dec 17 2017 11:50PM

बुकमार्क करा

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांना गाडण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. प्रशासनावर हल्लाबोल करण्याबरोबर आता मुळावर घाव घाला. सत्ताधार्‍यांनी धर्माचा, जातीचा कट्टरतावाद पहिला आहे. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या पोरांचा कट्टरतावाद दिसेल. नागपूर-रत्नागिरी आणि विजापूर-गुहागर मार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा एल्गार शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक कॉ. डॉ. अजित नवले यांनी पुकारला. विजापूर-गुहागर मार्गाचा आराखडा खासदार संजय पाटील यांच्या गावासाठी का बदलला, असा सवालही त्यांनी केला. 

तालुक्यातील शिरढोण-बोरगाव येथील ज. म. करपे हायस्कूलच्या मैदानावर भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कॉ. उमेश देशमुख अध्यक्षस्थानी होते. 
डॉ. नवले म्हणाले, विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. काळ्या आईचा बळी देऊन आणि शेतकर्‍यांच्या जगण्याची शैली बदलून केला जाणारा विकास शेतकर्‍यांना मान्य नाही. नागपूर-रत्नागिरी आणि अन्य महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाची लढाई सुरू करा. 

डॉ. नवले म्हणाले, आंदोलनाची दिशा बदलण्याची गरज आहे. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार आपले प्रश्‍न  सोडविणार नाहीत. या फांद्या वेळीच तोडाव्या लागतील. सत्ताधारी खासदार, आमदारांच्या घरासमोर बसा. अन्नात माती कालविणार्‍यांच्या शेंड्या कापा. आई-बाप शेवटचे आचके देत असताना पक्षांची आणि बावट्यांची आकड बाजूला ठेऊन संघटित व्हा, असा सल्ला दिला. धनाजी गुरव म्हणाले, विकासाच्या नावाखाली सातबारा धोक्यात आला आहे. रस्ता हवा की नको हे शेतकर्‍यांना ठरवू द्या, त्यासाठी ग्रामसभा घ्या, पुनर्वसनाच्या आधी ठरवा आणि त्यानंतर निर्णय घ्या. एकतर्फी एक इंचही जमीन देणार नाही. मोदींनी प्रत्येक दिवस शेतकर्‍यांसाठी संकटांचा दिला आहे. आता आम्ही कुणाला घाबरत नाही. 

जयसिंगराव शेंडगे म्हणाले, शासन एकतर्फी आणि चुकीच्या पद्धतीने जमिनी काढून घेत आहे. त्या विरोधात आंदोलन करू. कोणत्याही परिस्थितीत सर्व बाबी स्पष्ट झाल्याशिवाय जमीन देणार नाही. शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहू. डॉ. सुदर्शन घेरडे यांनी स्वागत केले. कॉ. दिगंबर कांबळे यांनी आभार मानले. अरुण माने, भानुदास पाटील, नामदेवराव करगणे यांची भाषणे झाली. शिरढोण, बोरगाव, मळणगाव, अलकूड त्याचबरोबर नागज परिसरातील शेतकरी उपस्थित होते. खासदारांच्या गावासाठी  आराखडा बदलला  दुष्काळी टापूतून आणि कोरडवाहू जमिनीतून जाणारा विजापूर-गुहागर मार्गाचा आराखडा का बदलला. खासदार संजय पाटील यांच्या तासगावमधून रस्ता जावा यासाठी बागायतदार शेतकर्‍यांच्या जमिनी घालविल्या जात आहेत.