होमपेज › Sangli › धुळगावमध्ये तरुणाचा निर्घृण खून

धुळगावमध्ये तरुणाचा निर्घृण खून

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 03 2017 1:25AM

बुकमार्क करा

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे तमाशाच्या वेळी झालेल्या वादातून अशोक तानाजी भोसले  (वय 37) या तरुणाचा गुप्ती आणि कुकरीने वार करून निर्घृण  खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात सातजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   दरम्यान, संशयित आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी धुळगावच्या  संतप्त  ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन  केले. 

अग्रण धुळगाव येथे यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत तमाशा सुरू होता.  त्यावेळी काही तरुणांमध्ये वादावादी झाली. त्याची तक्रार यात्रा कमिटीकडे अशोक भोसले यांनी केली. त्याचा राग मनात धरून अशोक आणि प्रकाश तानाजी भोसले या दोघांना तमाशा संपल्यानंतर बाजूला बोलवून घेण्यात आले.या दोघांना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संदीप दादू चौगुले, विशाल बिरा चौगुले,  सागर बाळासाहेब चौगुले, कोंडीराम पांडुरंग कणप, विजय आप्पासाहेब चौगुले  (सर्व रा. अग्रण धुळगाव) आणि बिरा पांडुरंग कोळेकर (रा. आरेवाडी) यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गुप्ती, कुकरी आणि काठीने अशोक याच्या मांडीवर वार केले. 

त्याचवेळी प्रकाश यांनी हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सागर याने कुकरी हवेत भिरकावून  ‘मधे पडलास तर खलास करीन’ अशी धमकी दिली.  प्रकाश यांच्यावरही  हल्ला करून जखमी केले.त्यानंतर संशयित पसार झाले.कवठेमहांकाळ पोलिसात प्रकाश भोसले यांच्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी भेट दिली.  आरोपींना अटक करण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी दुपारी काही वेळ रास्ता रोको केला.  उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी आरोपींना अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  अधिक तपास  निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर यात्रेनिमित्तचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.