Sun, May 26, 2019 00:45होमपेज › Sangli › राष्ट्रीय महामार्गातून कवठेमहांकाळ वगळले?

राष्ट्रीय महामार्गातून कवठेमहांकाळ वगळले?

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:21AMकवठेमहांकाळ : गोपाळ पाटील

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणांना जोडण्यास प्राधान्य दिले जात असतानाच कवठेमहांकाळ शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रद्द करण्यात आला आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग बदलण्यात आला आहे. आता हा महामार्ग बोरगाव फाटा येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गास जोडला जाणार आहे. त्यानंतर नागज फाट्यापासून पुढे जत, विजापूरपर्यंत महामार्ग तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या या निर्णयामुळे तालुक्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

पूर्वी सांगली जिल्ह्यातून केवळ पुणे-बंगऴूर हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग जात होता. त्यानंतर आघाडी शासनाने रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रातील सरकार बदलले. नितीन गडकरी यांच्याकडे दळणवळण मंत्रालय आल्यानंतर जिल्ह्यात नव्याने दोन महामार्ग मंजूर करण्यात आले. त्यामध्ये विजापूर-गुहागर आणि बारामती-संकेश्‍वर या मार्गाचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर काही वादानंतर कराड-नागजफाटा या मार्गाचे महामार्ग ग्रेड एकमध्ये रुपांतर करण्यात आले. या सर्व निर्णयांमुळे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणणार असल्याचे स्पष्ट झाले. 

विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग होताना वाद झाला. जुन्या राज्य महामार्गामध्ये बदल करण्यात आला. गुहागरपासून कराडपर्यंतचा मार्ग पूर्वीचा ठेवण्यात आला. कराडपासून पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, डफळापूर, जत असा मार्ग निश्‍चित करण्यात आला. त्यावेळी विटा आणि कडेगाव वगळल्यामुळे रोष निर्माण झाला. त्यातून तोडगा काढण्यात आला. तो तोडगा काढताना जास्तीत जास्त तालुक्याची ठिकाणी जोडण्यास प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग निश्‍चित झाला. त्यानंतर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे हस्तांतरण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे रस्ते हस्तांतरित केल्यानंतर या मार्गाचे पुन्हा नव्याने सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर मार्ग बांधणीचे कामही मंजूर झाले.

गेल्या सहा महिन्यांच्या काळात विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कराड ते पलूस, पलूस ते तासगाव मार्गे बोरगाव फाट्यापर्यत दोन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र लांडगेवाडी फाटा ते कवठेमहांकाळ-जत रस्त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्याचवेळी नागजफाटा ते विजापूर या मार्गाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले.
कवठेमहांकाळ-जत हा सुमारे 40 किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गातून वगळण्यात आला आहे.

आता तो रस्ता पुन्हा राज्यमार्ग म्हणून राहणार आहे. तो रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे कवठेमहांकाळ शहरावर मोठा अन्याय होणार आहे. राष्ट्रीय महामार्गास शहर जोडण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले जात असताना कवठेमहांकाळ शहरास का वगळले? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या मुळे शहराच्या विकासावर मर्यादा येणार आहेत. नव्याने होणारा राष्ट्रीय महामार्ग कवठेमहांकाळ शहरास जोडून मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.

 

Tags : sangli, sangli news, Kavathe Mahankal, National Highway, skipped,