होमपेज › Sangli › मिरज ‘सिव्हिल’मध्ये कर्नाटकचे रुग्ण वाढले

मिरज ‘सिव्हिल’मध्ये कर्नाटकचे रुग्ण वाढले

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 10:19PMमिरज : जालिंदर हुलवान

आर्थिकदृष्ट्या मागास  आणि गरजू रुग्णांचा आधार असलेल्या मिरजेतील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) सांगली जिल्ह्यापेक्षा कर्नाटकातीलच रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी मिळणार्‍या वैद्यकीय सेवेच्या कोट्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथे आजही डॉक्टरांकडून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी दिली जाते आणि काही डॉक्टर  खासगी रुग्णालयातही प्रॅक्टिस करतात, अशा तक्रारी आहेत. रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन वारंवार बंद असते. 

मिरज ही आरोग्यपंढरी समजली जाते. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असणारे व सर्वाधिक रुग्णालये असणारे हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. सन 1962 मध्ये येथे शासकीय रुग्णालय व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याहस्ते या जागेचे व भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी एकूण 80 एकर जागा देण्यात आली होती.

हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर  गोरगरीब  व गरजू रुग्णांना मोठा आधार मिळाला. या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे 600 ते 750 आणि आंतररुग्ण विभागात सुमारे 200 ते 250 रुग्ण  उपचारांसाठी दाखल होतात. 

गरजूंच्यादृष्टीने आणि मिरजेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी ही शासकीय संस्था आहे. येथील अनेक विभागांमध्ये पदे रिक्त आहेत.  अनेक कर्मचारी गायब असतात. परिणामी जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावरच कामाचा भार जास्त पडतो. काही डॉक्टर  खासगी रुग्णालयात काम करतात. काही जणांची तर खासगी रुग्णालये उघडपणे सुरू आहेत, अशा तक्रारी आहेत.

रुग्णालयातील  सर्व लिफ्ट बंद अवस्थेत आहेत. त्यांचा वापर हा अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी होतो. लिफ्ट बंद असल्यामुळे जिने चढून जाताना रुग्णांचे हाल होतात. औषधांचा अधूनमधून तुटवडा असतो. रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना ही औषधे बाहेरून आणावी लागतात. रुग्णालयाच्या परिसरामध्ये सुरू करण्यात आलेले ठेक्याचे औषध दुकान बंद करण्याची मागणी रुग्णांकडून वारंवार केली जात आहे. 

जेनेरिक औषधांसाठी शासनानेच पुढाकार घेतला आहे. पण शासकीय रुग्णालयात अशा जेनेरिक औषध दुकानांची गरज असताना ते सुरू का होत नाही, असा सवाल होतो आहे. खासगी रुग्णालयांमध्ये होणार्‍या अत्याधुनिक तपासण्या, औषधोपचर, तज्ज्ञ डॉक्टर अशी सर्व प्रकारची यंत्रणा येथील शासकीय रुग्णालयात आहे. 

पण या सर्व यंत्रणेचा गोरगरिबांना किती फायदा होतो, हा  प्रश्‍न आहे. सीटीस्कॅनचे मशीन आहे. तसा फलकच रुग्णालयात लावण्यात आला आहे. पंधरा दिवसांपासून हे मशीन बंद असल्याचे काही कर्मचार्‍यांनीच सांगितले.

Tags : Karnataka, patient, grew, Miraj Civil,