Mon, Aug 19, 2019 05:42होमपेज › Sangli › कर्मवीरांच्या मूळ गावी स्मारक उभे रहावे 

कर्मवीरांच्या मूळ गावी स्मारक उभे रहावे 

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:25PM

बुकमार्क करा

ऐतवडे बुद्रूक : सुनील पाटील

शिक्षणाची गंगा गोरगरिबांपर्यंत आणून शैक्षणिक विकासाचा पाया रचणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे यथोचित स्मारक ऐतवडे बुद्रुक ( ता. वाळवा) या त्यांच्या मातृभूमीत उभा रहावे, अशी पंचक्रोशीतील जनतेतून मागणी जोर धरू लागली आहे. 

नुकत्याच झालेल्या कर्मवीर विद्यालयात पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन आमदार शिवाजीराव नाईक यांच्याहस्ते झाले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या राष्ट्रीय दर्जाचे स्मारकासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी आ. नाईक म्हणाले, रयत शिक्षण संस्थेने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून त्याचा प्रस्ताव दिला तर मुख्यमंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा करून या स्मारकासाठी भरीव निधी उपलब्ध देऊ. 

ऐतवडे बुद्रूक या कर्मवीरांच्या मातृभूमीत माजी जि .प. सदस्य अभिजित पाटील यांनी अर्ध पुतळ्याच्या ठिकाणी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून स्मारक उभे केले. या विद्यालयास सुमारे 14 एकर जमिनीचे क्षेत्र आहे. सन 1949 मध्ये  या शाळेची तामजाईच्या माळावर उभारणी केली. आमदार डॉ. पतंगराव कदम, तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत त्या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी गावात कर्मवीरांचे भव्य स्मारक उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कर्मवीरांचे पुतळे आहेत. पण त्यांच्या मूळ गावी  यथोचित स्मारक नाही. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेकडे उपलब्ध असणार्‍या जागेचा वापर करून प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा देणारे संशोधन केंद्र उभे राहणे गरजेचे आहे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय असावे. कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक भवन असावे. असे सर्वव्यापी स्मारक येथे उभारले तर नव्या परिवर्तनाची सुरूवात येथून होऊ शकते. आमदार नाईक यांनी याची दखल घेऊन हे काम मनावर घेऊन नवी परंपरा सांगली जिल्ह्यातून सुरू करावी, अशी पंचक्रोशीतल्या   ग्रामस्थांची अपेक्षा आहे.