Wed, Apr 24, 2019 08:04होमपेज › Sangli › ‘शिक्षणमहर्षीं’च्या मातृभूमीत नवा अध्याय

‘शिक्षणमहर्षीं’च्या मातृभूमीत नवा अध्याय

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 8:51PMऐतवडे बुद्रूक : सुनील पाटील

शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत युवकांनी पुढाकार घेऊन कर्मवीर अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील व वारणा टापूतील गरजू, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन निर्माण होत आहे.

गावातील सुशिक्षित युवकांनी एकत्रित येत कर्मवीर फाऊंडेशनची स्थापना केली आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून आणि स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलण्यासाठी तसेच अभ्यासात सातत्य राहण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तके, ग्रंथ, संदर्भ ग्रंथांची सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विनामूल्य सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. 

अमोल गायकवाड, रोहित गायकवाड, उदय गायकवाड, प्रा. अभय पाटील, प्रताप घाटगे, प्रशांत कुंभार यांच्यासह तरूणांनी पुढाकार घेतला आहे.  गावातील 15 ते 20 युवकांनी एकत्रित येवून ‘कर्मवीर अभ्यासिके’ची  स्थापना केली आहे. शिका, समृद्ध व्हा हा कर्मवीरअण्णांचा संदेश डोळ्यासमोर ठेवून या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यात येणार आहे. 

कर्मवीरअण्णांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावातील होतकरू तरूणांनी समाजप्रबोधनाचे वृत्त हाती घेतले आहे. दानशुरांनी तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने या अभ्यासिकेसाठी आर्थिक मदत देण्याचेही आश्‍वासन दिले. सन्मती संस्कार मंचच्या संघटकांनी या उपक्रमासाठी वस्तू स्वरुपात मदत केली आहे. कर्मवीर फाऊंडेशनच्यावतीने  अनेक सामाजिक कार्यात या युवकांनी पुढाकार घेतला आहे. 

शिक्षण, आरोग्य, संस्कृती, संस्कार यासह विविध उपक्रमांची सुरूवात या युवकांनी केली आहे. आठवड्यातून प्रत्येक रविवारी स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा परिसर स्वच्छता अशा विविध उपक्रमांचा संकल्प केला आहे.  स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्यासाठी गावात मंदिर परिसर, दुर्लक्षित आड परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी दोन तास स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे.