Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Sangli › ‘करजगी’हे तर केवळ हिमनगाचे टोक!

‘करजगी’हे तर केवळ हिमनगाचे टोक!

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:38PMसांगली : अभिजित बसुगडे

जत तालुक्यातील करजगी येथे रविवारी दीड एकरातील गांजाची झाडे जप्त करण्यात आली. मात्र करजगीतील शेती ही केवळ हिमनगाचे एक टोक आहे. जत तालुक्यात आजही हजारो एकरांवर गांजाची शेती केली जात आहे. गांजा उत्पादकांसह तस्करांचा गॉडफादर मात्र आजही मोकाटच आहे.  पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासारख्या धडाकेबाज अधिकार्‍यांनी या कारवाईत सातत्य ठेवल्यास गांजा उत्पादनाचे समूळ उच्चाटन होणे शक्य आहे. 

करजगी येथे केवळ दीड एकरात 1 हजार 350 टन गांजा सापडला. त्याची बाजारभावानुसार अडीच कोटी रुपये किंमत होते. यावरूनच जत तालुक्यात गांजाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

चंदन, गांजा व जत तालुक्याचे समीकरण फार जुने आहे. पूर्वभागाचे शेजारच्या कर्नाटक राज्याशी कनेक्शन असल्याने तस्करीचे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. कर्नाटकातील गुन्हेगारी टोळ्या, तस्कर यांच्या माध्यमातून हे रॅकेट चालविले जात आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व केरळमध्ये चंदन व गांजाची तस्करी केली जात आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई तसेच शेजारच्या गोवा राज्यातही तस्करांचे नेटवर्क कार्यरत आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील कोंत्यावबोबलाद, मोटेवाडी (कोंत्यावबोबलाद), तिकोंडी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, सोनलगी, जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी, अंकलगी, माडग्याळ, प्रतापपूर, तिप्पेहळ्ळी, अचकनहळ्ळी, करेवाडी, गिरगाव, भिवर्गी, मुचंडी, उमदी व पश्‍चिम भागातील हिवरे, बाज, बेळुंखी ही काही गावे  गांजाचे उत्पादन ,  तस्करीमुळे चर्चेत आहेत.

मुळात गांजाच्या उत्पादनाला शासनाने बंदी घातली आहे. शिवाय त्याचे उत्पादन, विक्री, सेवन केल्यास कडक कारवाईची तरतूदही आहे. मात्र अशी कारवाई होताना दिसून येत नाही. सुरुवातीला गांजाचा ग्राहक कमी प्रमाणात होता. मात्र सध्या तरूण पिढी विशेषतः अल्पवयीन मुले या नशेच्या आहारी गेल्याने त्याचा ग्राहकवर्ग वाढला आहे. त्यातूनच तस्कर, विक्रेत्यांनी लाखोंची माया मिळवली आहे. 

सीमा भागात असलेल्या चेक नाक्यांवर तस्करांचे हप्ते ठरलेले आहेत.  शिवाय मोठ्या साहेबांचा दौरा, विशेष पथकाच्या दौर्‍याची खबर त्यांच्याकडून तस्कर आणि उत्पादकांना दिली जाते. त्यामुळे या साखळीत चेक नाक्यांवरील लोकांचाही सक्रीय सहभाग निर्माण झाला आहे. अशा झारीतील शुक्राचार्यांवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कारवाईची करण्याची गरज आहे.