Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Sangli › कामटेच्या मामेसासर्‍याच्या घरावर छापा

कामटेच्या मामेसासर्‍याच्या घरावर छापा

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:46PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळेच्या घरावर सीआयडीच्या पथकाने छापा टाकला. यावेळी कांबळे याने कामटेला मदत करताना वापरलेल्या काही वस्तू किंवा अन्य संशयास्पद साहित्याचा शोध घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सीआयडीच्या पथकाने सांगली शहर पोलिस ठाण्यातही चौकशी केली. तेथील ड्युटी रजिस्टरही ताब्यात घेण्यात आले आहे. 

अनिकेतच्या खुनासंदर्भातील सीआयडीचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणात कामटेसह अन्य संशयितांना फोन करणार्‍यांची चौकशी करण्यात आली आहे. अजूनही काहीजणांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी काही पोलिसांचीही चौकशी करण्यात आली आहे. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीच्या घाटावर अमोल भंडारेला धरून बसलेल्या दोघांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. 

भंडारेला धरून बसणारे दोघे असल्याच्या संशयावरून अनेकांकडे चौकशीही करण्यात येत आहे. याप्रकरणी सीआयडीचे अधिकारी कसून तपास करत असून लवकरच त्या दोघांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सीआयडीच्या पथकाने शहर पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिक माहिती घेतली. त्याशिवाय त्यादिवशीच्या ड्युटी डायरीसह अन्य कागदपत्रेही सीआयडीने ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान, याबाबत सीआयडीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.