Sun, May 26, 2019 00:39होमपेज › Sangli › पाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी

पाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 16 2017 1:48AM

बुकमार्क करा

कडेगाव ः वार्ताहर 

ताकारी व टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. येत्या आठ दिवसात दोन्ही योजनांचे पाणी सुटण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी  माहिती सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 देशमुख म्हणाले, ताकारी व टेंभूच्या वाढीव थकित वीज बिलामुळे ही योजना सुरू करण्यास गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे भविष्यात ही योजना सौर उर्जेवर चालवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पाणीपट्टीची 80 टक्के रक्कम शासन, 20 टक्के पाणीपट्टीची रक्कम शेतकर्‍यांकडून कपात करून घेण्याचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सिंचन योजनांच्या संदर्भात शासन सकारात्मक आहे. तसेच गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांंपर्यंत पोहोचवून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार योजना, दिव्यांग मित्र अभियान, दलित सुधार योजना, यांसारख्या विविध प्रकारच्या योजना गरीब व गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायती इ ग्राम सॉफ्टवेअर प्रणालीने जोडल्याने  शासनाच्या सर्व योजनांची माहिती गावातील सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यास मदत झाली आहे. तसेच सांगली जिल्हा परिषदेने आदर्श जिल्हा परिषद योजनेत भाग घेतला आहे. ते म्हणाले, शिक्षक, पेन्शनर्स यांचे प्रश्‍नही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.