Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Sangli › कडेगाव तालुका बनला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र 

कडेगाव तालुका बनला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र 

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 12:32AMकडेगाव : रजाअली पिरजादे 

निसर्गाच्या कुशीत वसलेला कडेगाव तालुका आज पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. कडेगाव तालुक्याला डोंगराळ तालुका म्हणून ओळखले जाते.कडेगाव तालुक्याच्या चारी बाजूंना सह्याद्री पर्वतांच्या रांगेने वेढले आहे. नैसर्गिकरित्या चार डोंगराळी भाग दिसून येतात. सोनहिरा, शाळगाव, नेर्ली खोरे आणि खेराडे-वांगी परिसरात निसर्गरम्य वातावरण पहायला मिळते. याशिवाय तालुक्यात आणि परिसरात देवदेवतांच्या जुन्या काळातील देवालये दिसतात. पावसाळ्यात आणि विशेष करून श्रावण महिन्यात एक आगळा-वेगळा आनंद अनुभवायला मिळतो. 

सागरेश्‍वर अभयारण्य जगप्रसिद्ध असून येथे सागरेश्‍वर देवस्थानही आहे. त्याचबरोबर चौरंगीनाथ मंदिर, लिंगेश्‍वर मंदिर, महादेव मंदिर अशी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मंदिरे येथे पाहायला मिळतात. याठिकाणी देवताळ, बालोघान, छत्रीबंगला, वेणूविहार तलाव, घोडेबीळ, तरस गुहा, बानदार, रनशुळा, शिखर, महानगुंड, किर्लोस्कर पोइंट वगैरे पर्यटन स्थळे आहेत. अभयअरण्यात विविध प्रकारचे प्राणीही आढळतात. यामध्ये प्रामुख्याने तरस, लांडगा, कोल्हा, खोकड, सायाळ,  मांजर, चितळ, काळवीट, चिंकारा बरोबर घार, गिधाड, ससाणा, पारवा,  पिंगळा, तांबडा होला, खंड्या, सुतार, धनछडी, सुगरळ, बगळा आदी पक्षी आढळतात. 

कडेगावच्या दक्षिणेला उंच डोंगरावर डोंगराईचे मंदिर आहे. येथून संपूर्ण कडेगाव तालुक्याचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. वर्षातून तीन वेळा येथे यात्रा भरते. या डोंगरावर भला मोठा पठारी प्रदेश आहे. येथील वाघझरा व तरस गुहा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विविध जातीचे पक्षी, वन्यप्राणी आणि औषधी वनस्पती आढळतात. वैशिष्ठे म्हणजे समुद्र सपाटीपासून जिल्ह्यात सर्वात उंच असे हे ठिकाण असल्याचे बोलले जाते. डोंगराईच्या पायथ्याला कडेगाव येथील थोर संत श्री गोविंदगिरी महाराज यांची   समाधी आहे. कडेगावात आदिलशहाच्या काळातील जुनी मशीद, पौराणिक काळातील हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर त्याबरोबर आदिलशाच्या काळातील बाराकमानी साखर विहीर पहायला मिळते.

कडेगावपासून जवळ नेर्ली येथे ऐतिहासिक पीर बेबानी साहेब यांचा दर्गाह आहे. कडेपूर-पुसेसावळी रोडवर हिंगणगाव बुद्रुक येथे हजार वर्षापूर्वीची श्री नारायणस्वामी महाराजांची   समाधी पहावयास मिळते. या शिवाय सोनसळ येथील प्रसिद्ध चौरंगीनाथ मंदिर आहे. येथून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. येथे पर्यटकासाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सागरेश्‍वर अभयारण्य, चौरंगीनाथ मंदिर, डोंगराईदेवी मंदिर यांना शासनाने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. साहजिक या सर्वच ठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी  नेहमीच दिसून येते. या विविध कारणांनी आज पर्यटनाच्या नकाशावर कडेगाव तालुका झळकू लागला आहे. त्यामुळे येथील निसर्ग  सौंदर्य पाहण्यासाठी आणि विविध देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते. येथे सध्या पावसाळ्याचे दिवस असून या परिसराने हिरवा शालू परिधान केला आहे. त्यामुळे सध्या निसर्ग सौंदर्यात एक वेगळे चित्र कडेगाव तालुक्यात पहावयास मिळत असून, लोकांचे आकर्षणाचे ते एक केंद्र बनले आहे.