Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Sangli › कडेगावमध्ये रोडरोमिओंचा सुळसुळाट

कडेगावमध्ये रोडरोमिओंचा सुळसुळाट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कडेगाव : रजाअली पिरजादे

कडेगावात रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना अश्‍लील टोमणे मारणे, दुचाकी आडव्या मारणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामुळे त्रास होत असल्याची भावना विद्यार्थिनीं व्यक्त करीत आहेत. मात्र याकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थिनी व पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरात अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. अनेक ठिकाणी खासगी क्लासेस आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींसह युवती व महिलांची येथे वर्दळ असते. येथील बसथांब्यावरही कराड, विटा शहरात उच्च शिक्षण व कामासाठी जाणार्‍या युवती, महिलांची सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गर्दी असते. भाजीपाला व अन्य खरेदीसाठी बाजारात  महिलांची दिवसभर  ये-जा असते. 

त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे.  विद्यालयांच्या व मुख्य चौकाच्या रस्त्यावरील एखाद्या दुकानासमोर बसून अश्‍लील भाषा वापरणे, विद्यार्थिनींच्या जवळून मोटारसायकल वेगात चालवणे,  ठिकठिकाणी चौकात उभे राहून अश्‍लील बोलणे, 

टीका-टिप्पणी करणे असे छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. सैराट रोडरोमिओ अल्पवयीन विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन युवतींना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करण्याचा आणि जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. याचा बाजारात येणार्‍या महिला,  युवतींना मानसिक त्रास होत आहे.  या सर्व प्रकाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहेे. यामुळे विद्यार्थिनी व महिलांमधून नाराजी व्यक्त होत  आहे.