होमपेज › Sangli › ‘कडकनाथ’ आता देतेय प्रयोगशील शेतकर्‍यांना ‘हात’

‘कडकनाथ’ आता देतेय प्रयोगशील शेतकर्‍यांना ‘हात’

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 10:52PM“काळी कुळकुळीत चोच, काळा तुकतुकीत रंग, मांसदेखील काळ्या रंगाचे, मांसात असलेले विलक्षण औषधी गुण”

कडकनाथ चिकनने आता प्रयोगशील शेतकर्‍यांच्या मनावर  गारूड घातले आहे. पन्नास रुपये अंड्यांचा दर आणि प्रतिकिलो मांसाला तब्बल 900 ते 1000 रुपयांचा मोबदला आणि यासाठी हमखास बाजारपेठेची शाश्‍वती यामुळे कडकनाथ कोंबडी आता जणू दुभती गाय ठरते आहे.  

सर्वत्रच वाढती क्रेझ असलेल्या कडकनाथ चिकन आणि तिची अंडी यांना असलेली वाढती मागणी आहे. पारंपरिक देशी कोंबडीपेक्षा कडकनाथ ही वेगळी जात आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेशातील आदिवासी लोक  दुर्गम भागातील झाबुआ खोर्‍यात कडकनाथ कोंबड्यांचे पारंपरिक रितीने पालन करतात. काळी कुळकुळीत चोच, काळा तुकतुकीत रंग, मांसदेखील काळ्या रंगाचे आणि मांसात असलेले विलक्षण औषधी गुण यामुळे कडकनाथ चिकनला मागणी वाढू लागली आहे.  

आष्टा येथील साईराज विकास पाटील या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुण शेतकर्‍याने कडकनाथ कोंबडी पालनाचा केलेला प्रोजेक्ट हा आता प्रातिनिधीक ठरतो आहे.  इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत असलेल्या साईराजने कडकनाथ कोंबडीपालनाचा अभ्यास केला. मांसासाठी कोंबड्या, अंडी खरेदीची आणि प्रोजेक्टसाठी एका कंपनीने हमी दिल्यानंतर तर त्याचा उत्साह अधिकच वाढला. त्याने कडकनाथ चिकनची 150 पिले आणली आहेत. 150 पिलांमध्ये नर मादीचे प्रमाण हे 20: 80 असे ठेवावे लागते. पिलांमध्ये  दीड दोन महिन्यात नर मादी ओळखून येते. यानंतर जादा ठरणारी नर जातीची पिले मांसासाठी विकणार आहे. कडकनाथ कोंबडी साडेपाच महिन्यानंतर अंडी देण्यास सुरूवात करते. सरासरी रोज एक अंडे मिळते. साडेपाच महिन्यानंतर साडेसहा महिन्यांपर्यंत  ही कोंबडी रोज  एक अंडे देते. प्रत्येक कोंबडी 66 ते 63 अंडी देईल असे अपेक्षित आहे. या अंड्यांची प्रत्येकी 50 रुपये प्रमाणे  कंपनीने खरेदीची हमी घेतली आहे.  

वर्षात एका कोंबडीचे वजन 1 ते दीड किलोच्या घरात भरते.   हे मांस साधारणपणे 900 ते 1000 रु. प्रतिकिलो या दराने खरेदी करण्याची हमी आहे. दीडशे कोंबड्यांच्या प्रकल्पासाठीचा खर्च  वजा जाता अंडी आणि मांसापासून जवळपास पावणे तीन लाखाचे उत्पन्न हमखास मिळेल, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला.  कडकनाथचे मांस गुणकारी (केले जाणारे दावे ) :  कडकनाथचे मांस आणि अंडी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.  दमा, क्षय आदींवर हे मांस गुणकारी ठरते.  प्रोटिन्स्चे  25 टक्केपेक्षा अधिक, ह्रदयविकार धोका कमी होतो. मांसात 0.73 ते 1.04 टक्के इतकेच चरबीचे प्रमाण, प्रति 100 ग्रॅममागे 184.76 मिली ग्रॅम कोलेस्टेरॉल, रक्ताचा कर्करोग, त्वचाविकारावर उपयुक्त , महिलांचे आजार, शुक्रजंतू वृध्दिवर्धक  यासाठी कडकनाथचे मांस उपायकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे निष्कर्ष असल्याचे सांगण्यात येते. 
कडकनाथचे अंडे देखील औषधी आहे. डोकेदुखीचा आजार, दमा, किडनीचे विकार अंडे नियमित खाल्ल्यास नियंत्रणात येतात असे आता तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.