Fri, Apr 26, 2019 17:57होमपेज › Sangli › सांगली : ..तर तुमच्या दारात आत्मदहन करू

सांगली : ..तर तुमच्या दारात आत्मदहन करू

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसपुत्र कौस्तुभ पवारसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज फसवणूक झालेला कर्जत येथील युवक मोहन अशोक शिंदे याचे वडील आणि भावाने कुपवाडमधील पवारच्या घराकडे धाव घेतली.  त्यांनी फसवणुकीबाबत पवार कुटुंबियांकडे जाब विचारला. दि. 12 डिसेंबरपर्यंत मुलांची सुटका न झाल्यास तुमच्या दारात सर्व कुटुंबीय आत्मदहन करतील असा इशारा दिला. 

मंगळवारी रात्री उशिरा पेठ येथील नामदेव कुंभार यांनी पोलिसपुत्र कौस्तुभसह धीरज पाटील याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन संशयितांनी नामदेव कुंभार यांचे मेहुणे गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, ता. अक्कलकोट), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक माने (रा. हुन्नर, जि. सोलापूर), सदानंद धनगर (रा. जवळगाव) यांचीही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

आज सकाळी मोहन शिंदेचे वडील अशोक तुकामार शिंदे व त्याचा भाऊ नंदकिशोर दुपारी बाराच्या सुमारास पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याच्या वसंतनगरमधील  घरी दाखल झाले. शिंदे पितापुत्रांनी पवार कुटुंबियांवर प्रश्‍नांचा भडीमार केला. पैसे घेऊनही आमचा व आमच्या मुलांची फसवणूक का केली, अशा  प्रश्‍नांची सरबत्ती त्यांच्यावर केली. 

दि.12  डिसेंबरला मलेशियात त्या चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांची सुटका न झाल्यास आम्ही सर्व कुटुंबीय तुमच्या दारात येऊन सामुहिक आत्मदहन करू, असा इशाराही यावेळी शिंदे पिता-पुत्रांनी दिला. पवार कुटुंबियांनी धीरज पाटीलनेच कौस्तुभची फसवणूक केल्याचे सांगितले. तसेच त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचेही शिंदे पिता पुत्रांना सांगितले.