Tue, Jul 23, 2019 19:13होमपेज › Sangli › कॉल डिटेल्सवरून पोलिसपुत्राचा शोध

कॉल डिटेल्सवरून पोलिसपुत्राचा शोध

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:25PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसपुत्र कौस्तुभ पवार गेल्या पंधरा दिवसांपासून गायब आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पथकाकडून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. तर कॉल डिटेल्सवरून  कौस्तुभ पवारचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री उशिरा पेठ येथील नामदेव कुंभार यांनी पोलिसपुत्र कौस्तुभसह धीरज पाटील विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघा संशयितांनी नामदेव कुंभार यांचे मेहुणे गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, ता. अक्कलकोट), तसेच मोहन शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक माने (रा. हुन्नर, जि. सोलापूर), सदानंद धनगर (रा. जवळगाव) यांचीही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानंतर गुरुवारी सकाळी मोहन शिंदेचे वडील अशोक तुकाराम शिंदे व त्याचा भाऊ नंदकिशोर कौस्तुभ पवारच्या कुपवाडमधील वसंतनगरमधील शिवराज कॉलनीत असणार्‍या घरी गेले.  दि. 12 डिसेंबरला मलेशियात त्या चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांची सुटका न झाल्यास आम्ही सर्व कुटुंबिय तुमच्या दारात येऊन सामुहिक आत्मदहन करू, असा इशाराही शिंदे पिता-पुत्रांनी त्यावेळी  दिला होता. 

दरम्यान, पोलिसांशी फसवणूक झालेल्या युवकांचे नातेवाईक कौस्तुभ संपर्क साधत असल्याचे सांगत आहेत. मात्र त्याच्या पुढील माहिती ते देत नसल्याने त्याच्या शोधात अडथळे येत आहेत. तरीही कौस्तुभच्या कॉल डिटेल्सवरून त्याचा शोध सुरू ठेवण्यात आला आहे.