Wed, Jan 22, 2020 14:07होमपेज › Sangli › नोकरीच्या आमिषाने सहा जणांना गंडा

नोकरीच्या आमिषाने सहा जणांना गंडा

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:24AM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी

दुबईमध्ये मॉलमध्ये विविध पदांवर नोकरी व त्यासाठी व्हिसा देतो, असे सांगून सहा तरुणांना सुमारे सव्वादोन लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी मेहबूब मोहिद्दीन सय्यद (रा. किल्‍ला भाग, मिरज) याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तो सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत फसवणूक झालेल्या भाऊसाहेब लक्ष्मण हंकारे (वय 32, रा. तडसर, कडेगाव) याने तक्रार दिली आहे. ही फसवणूक ऑक्टोबर 2016 ते 31 डिसेंबर 2017 यादरम्यान झाली आहे. स्वत: तक्रारदार, त्याचा मित्र सचिन जाधव, मधुकर हंकारे, आतिक अल्लाउद्दीन नरवाडे, शाहरूख वलिद आलासे, मजज सांगलीकर यांचीही फसवणूक झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

 दुबईत मॉलमध्ये ट्रॉली बॉय, हाऊस कीपिंग, एअर फोर्ट बाऊन्सर या पदांवर नोकरी देतो. दुबईमध्ये जाण्यासाठी लागणारा व्हिसा देतो, असे सांगून त्याने त्यांच्याकडून सुमारे सव्वादोन लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही त्यांना नोकरी न लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

पोलिसांनी मेहबूब सय्यद याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना तो सापडला नाही. त्याने तेथे एक दुकान भाड्याने घेतले होते. ते दुकान आता बंद  आहे. तक्रारीमध्ये सहा जणांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले आहे; पण प्रत्यक्षात अनेकांकडून असे पैसे घेतले असतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.