Wed, Nov 21, 2018 21:29होमपेज › Sangli › नोकरीचे आमिष दाखवून युवतीला ७५ हजारांचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवून युवतीला ७५ हजारांचा गंडा

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 17 2017 12:47AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मी शिरोळ पोलिस ठाण्यात पोलिस आहे. तुला पोलिसात भरती करतो. आतापर्यंत अनेकांना मी पोलिसात भरती केले आहे असे सांगून एका भामट्याने एका युवतीला 75 हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी शनिवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निखिल खाडे (रा. घालवाड, शिरोळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनीषा लक्ष्मण पाटील (वय 21, रा. चांदोली वसाहत , बागणी) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील एका स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रशिक्षण घेत होत्या. गतवर्षी जानेवारीमध्ये खाडे त्या केंद्रात आला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर खाडेने  शिरोळ पोलिस ठाण्यात पोलिस म्हणून काम करीत असल्याचे पाटील यांना सांगितले. 

‘आतापर्यंत मी अनेकांना पोलिस भरती केले आहे. तुलाही पोलिसात भरती करतो’ असे पाटील यांना सांगितले. त्यानंतर गतवर्षी जानेवारीमध्ये भरतीसाठी ‘साहेबांना पैसे द्यायचे आहेत’ असे सांगून त्यांच्याकडून 15 हजार रुपये घेतले. त्यानंतर मार्च 2016 पर्यंत वेळोवेळी पैसे घेतले. असे एकूण 75 हजार रुपये त्याने पाटील यांच्याकडून उकळले. 

त्यानंतर खाडेला भरतीबाबत पाटील यांनी तगादा लावला होता. मात्र, तो टाळाटाळ करीत होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर पाटील यांनी अखेर शनिवारी खाडेविरोधात फिर्याद दिली आहे.