होमपेज › Sangli › नोकरीच्या आमिषाने २१ लाखांना गंडा

नोकरीच्या आमिषाने २१ लाखांना गंडा

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

रेल्वे आणि पोलिस दलात भरती करतो, तसेच अन्य शासकीय कार्यालयात नोकरी देतो, असे  आमिष दाखवून, तसेच बनावट नियुक्‍तिपत्रे देऊन रावळगुंडवाडी (ता. जत) येथील चार युवकांना 21 लाख 39 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सचिन आण्णाराया अमृतहट्टी (वय 35, रा. तिकोंडी, ता. जत) याच्याविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी बसवराज सत्याप्पा हिरगोंड याने फिर्याद दिली आहे. बसवराजसह महेश महादेव पाटील, काशिनाथ विद्यासागर जुमनाळ, अरविंद सदाशिव हिरगोंड या युवकांचीही सचिन अमृतहट्टी याने लाखो रुपयांना फसवणूक केली आहे.  

सचिनची बसवराजशी काही कारणाने जून 2016 मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी सचिनने त्याला रेल्वे, पोलिस खात्यात भरती करण्याचे आमिष दाखविले होते. शासकीय नोकरी देतो असे  आमिष दाखवल्याने बसवराजने त्याला वेळोवेळी असे एकूण 9 लाख रूपये दिले होते. त्याशिवाय महेश पाटीलने पाच लाख, काशीनाथ जुमनाळ याने 3 लाख 89 हजार, अरविंद हिरगोंड याच्याकडून साडेतीन लाख रूपये त्याने वेळोवेळी उचलले. पैसे घेताना रेल्वेत किंवा पोलिस भरती करतो असे त्याने वारंवार आमिष दाखवले होते असे तक्रारीत म्हटले आहे. 

पैसे देऊन बरेच महिने झाले तरी नोकरी मिळत नसल्याने चौघांनाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर चौघांनीही त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यांचा तगादा वाढल्यानंतर अमृतहट्टी याने खोटी दस्तावेज तयार करून चौघांनाही बनावट नियुक्तीपत्रे दिली. त्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसात कामावर हजर करून घेण्यात येईल असेही सांगितले. त्यानंतर दोन वर्षे झाली तरी कामावर हजर करून न घेतल्याने चौघांनीही त्याच्याकडे पैशांसाठी पुन्हा तगादा लावला. 

नंतर मात्र त्याने चौघांनाही टाळण्यास सुरूवात केली. नंतर तर त्याने पैसे परत देण्यास नकारच दिला. त्यामुळे बसवराज हिरगोंड याने बुधवारी त्याच्याविरोधात जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार अधिक तपास करत आहेत.