Tue, Jul 23, 2019 16:55होमपेज › Sangli › मलेशियातील मुख्य सूत्रधारावर कारवाईत पोलिसांना अडचणी

मलेशियातील मुख्य सूत्रधारावर कारवाईत पोलिसांना अडचणी

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:30PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसपुत्रासह मुख्य एजंटाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हे दोघे मलेशियातील जीवा नावाच्या व्यक्तीकडे तरुणांना पाठवत होते. जीवा मलेशियाचा नागरिक असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अनेक अडचणींना पोलिसांना तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसपुत्र कौस्तुभ पवारच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

मुख्य एजंट धीरज पाटीलसह पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याच्याकडे पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्याकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. दोघांकडेही वेगवेगळी चौकशी करण्यात आली आहे. त्यात दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यांनी जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले.   

धीरजने एक वर्षापूर्वी मलेशियात वेटर म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याची स्थानिकांशी घसट झाली होती. त्यातून येथील तरुणांना नोकरीसाठी मलेशियात पाठविण्याची शक्कल त्याला सुचली. त्यातूनच त्याने या युवकांना मलेशियात पाठविले होते. यासाठी तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्याने कौस्तुभ पवारचा वापर केला. त्या तरुणांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन त्यांना मलेशियात पाठविण्यात येत असे. 

मलेशियातील जीवा नामक व्यक्तीच्या संपर्कात धीरज होता. जीवा येथून पाठविलेल्या युवकांची तेथे सोय करीत होता. त्यामुळे या गुन्ह्यात जीवाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तो मलेशियाचा नागरिक असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पोलिस पुढे काय कारवाई करतात याकडे फसवणूक झालेल्या युवकांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून राहिले आहे.