Thu, Aug 22, 2019 10:20होमपेज › Sangli › पोलिस मुख्यालयातून जीपची चोरी

पोलिस मुख्यालयातून जीपची चोरी

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:21AMसांगली : प्रतिनिधी

पोलिस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या समोर उभी असलेली जीप एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून जीपसह त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

अक्षय सतीश कवठेकर (वय 20, रा. कुपवाड) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी कवठेकर हजेरी देण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आला होता. त्यावेळी अन्य दोघेजणही जीप घेऊन कामानिमित्त तेथे आले होते. त्यावेळी त्यांनी तेथेच त्यांची जीप उभी केली होती. जीप चालकासह दोघेही आत गेल्यानंतर कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून कवठेकर जीप घेऊन निघून गेला. ही घटना लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. 

वारणालीत रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील रस्ता खराब आहे. याच रस्त्याने तो जीप घेऊन निघाला होता. मात्र अडथळ्यामुळे तो वेगात जाऊ न शकल्याने पोलिसांनी त्याला गाठले. जीपसह त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.