Tue, Nov 20, 2018 21:20



होमपेज › Sangli › भाजपविरोधात एकत्र येऊ या

भाजपविरोधात एकत्र येऊ या

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 03 2017 1:04AM

बुकमार्क करा





जयसिंगपूर : प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी शिरोळ येथे जाऊन खा. राजू शेट्टी यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भाजपविरोधी रान उठविण्यासाठी काँग्रेस व मित्रपक्षाबरोबर खा. शेट्टींनी हात द्यावा, एकत्रित काम करू, अशी गळ चव्हाण यांनी घातली. मात्र, शेट्टी यांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतल्याचे समजते. सकाळी 10.15 वाजता  खा. चव्हाण, आ. सतेज पाटील, माजी आ. प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील असे काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान भाजप, मित्रपक्षांची भूमिका, खा. शेट्टींनी भाजपविरोधी उठवलेले रान हा धागा पकडून खा. चव्हाण यांनी खा. शेट्टींना काँग्रेस व मित्रपक्ष यांचे भाजपविरोधी होणार्‍या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

त्यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेस नागपुरात 12 किंवा 13 डिसेंबरला जो मोर्चा काढणार आहे, त्यामध्ये शेट्टींनी सहभागी व्हावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. त्यांचे म्हणणे ऐकून खा. शेट्टी यांनी, लोकसभा निवडणुकीत दिलेले आश्‍वासन भाजपने न पाळल्यानेच स्वाभिमानीसह देशातील सर्व शेतकरी संघटना भाजपविरोधी एकवटल्या आहेत. दिल्लीत आम्ही संसदेवर मोर्चा काढला. गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारातही शेतकरी संघटनेचे देशातील प्रमुख नेते उतरणार आहोत.काँग्रेस व मित्रपक्षाच्या भाजपविरोधी आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही, हे मी तुम्हाला शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून सांगतो, असे सांगितल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले. खा. चव्हाण यांनी, आपण मुंबईला कधी येणार, बैठक घेऊ, असेही शेट्टींना म्हटल्याचेे कळते. यावेळी स्वाभिमानीचे भगवान काटे, सावकार मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, सागर शंभूशेटे, शुभांगी शिंदे, युनूस पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.